फुटबॉल वर्ल्डकपदरम्यान रशियन महिलांनी परदेशी पुरुष विशेषत: कृष्णवर्णीयांसोबत शरीरसंबंध ठेवू नये, असे विधान रशियातील महिला खासदाराने केले आहे. यापूर्वीही रशियन महिलांनी परदेशी पुरुषाशी लग्न केले असले तरी त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही हे विसरु नका, असेही या खासदाराने म्हटले आहे.

मॉस्कोत आजपासून फुटबॉल वर्ल्डकपला सुरुवात होणार असून यानिमित्त रशियातील खासदार तमारा प्लेत्नयोवा या रेडिओवरील चर्चासत्रात सहभागी झाल्या होत्या. त्या महिला, कुटुंब आणि बाल कल्याण समितीच्या प्रमुख आहेत. एका श्रोत्याने त्यांना १९८० मधील मॉस्कोतील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत प्रश्न विचारला. त्याकाळी रशियात गर्भनिरोधक गोळ्या नव्हत्या आणि स्पर्धेनंतर परदेशी पुरुषांशी संबंध ठेवल्याने जन्माला येणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले होते. यात कृष्णवर्णीय मुलांचे प्रमाण जास्त होते. या मुलांना रशियात वर्णभेदाचा सामना करावा लागला होता, असे त्या श्रोत्याचे म्हणणे होते.

यावर तमाना म्हणाल्या, आपण आपल्याच मुलांना जन्म दिला पाहिजे. परदेशी पुरुषांच्या मुलांना आपण जन्म द्यायला नकोच. अशा मुलांना पुढे त्रासाचा सामना करावा लागतो. त्यांचा वर्ण सारखाच असेल तर यात काही अडचण येणार नाही. पण जर कृष्णवर्णीय पुरुषाशी संबंध ठेवल्याने गौरवर्णीय मातेच्या पोटी कृष्णवर्णीय मुलाचा जन्म झाला तर वर्णद्वेषाचा सामना शेवटी मुलांनाच करावा लागतो, असे त्यांनी नमूद केले. रशियातील आणखी एका खासदाराने फुटबॉल वर्ल्डकपदरम्यान परदेशी नागरिक रशियात व्हायरस आणू शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहावे, असे आवाहन केले आहे.