२६/११च्या मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांनी अत्यंत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ‘हेमंत करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवलं होतं. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले,’ असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सेक्रेड गेम्सचा लेखक वरुण ग्रोवरनेही याबाबत ट्विट केले आहे.

‘मी नि:शब्द झालोय. भाजपाच्या भोपाळच्या उमेदवार आणि दहशवादच्या आरोपी उघडपणे २६/११ चे हिरो हेमंत करकरे यांच्या मृत्यूची कामना करतात. मग तर, कसाब साध्वी प्रज्ञा यांचा साथीदारच,’ असं ट्विट वरुणने केलं आहे.

वाचा : साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीविरोधात स्वरा भास्करचा हल्लाबोल; म्हणाली, ‘हाफीद सईद तर संत वाटत असेल तुम्हाला?’

बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या साध्वींना उमेदवारी दिल्यामुळे विरोधकांनी भाजपला घेरलं आहे. त्यांच्या उमेदवारीला आव्हानही देण्यात आलं आहे. हे करत असतानाच साध्वी यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘हेमंत करकरे यांनी मला खूप त्रास दिला. मला शिवीगाळ केली. मला बॉम्बस्फोट कटात गोवले. सुरक्षा आयोगाचा सदस्य असलेल्या एका चौकशी अधिकाऱ्यानं मला सोडण्याचे आदेश त्यांना दिले होते. मात्र, करकरे मला अडकवण्यावर ठाम होते. काहीही करून पुरावे गोळा करेन. पण तुला सोडणार नाही, असं करकरे म्हणाले होते. ‘करकरे हे कुटिलतेनं वागत होते. ते देशद्रोही, धर्मद्रोही होते,’ असं साध्वी म्हणाल्या.