उत्तर प्रदेशातील गावांमध्ये अल्पसंख्यांक लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिमांना दफनभूमीची जागा दिली पाहिजे. ज्या गावात मुस्लिम संख्या कमी आहे तिथे मोठ्या दफनभूमी असणे हे अन्यायकारक आहे असे विधान भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील बंगरमऊ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार श्रीकांत कटियार यांच्या समर्थनार्थ उन्नाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना साक्षी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे. पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.
“दफनभूमी आणि स्मशानभूमीचे प्रमाण हे एक सारखे असणे आवश्यक आहे. एखाद्या गावात एक मुसलमान असला तरी तेथे मोठी दफनभूमी असते. त्यामुळे तुम्हाला एकतर शेतात किंवा गंगेत अंत्यसंस्कार करावे लागतात. हा अन्याय नाही का?” असा सवाल साक्षी महाराज यांनी केला आहे.
हे सर्व दुर्दैवी असून आमची कोणावर सक्ती नाही. फक्त आपल्या संयमाची परीक्षा घेवू नका असे साक्षी महाराज म्हणाले. मुस्लीम समाजाने सुद्धा मृत व्यक्तींना दफन न करता जाळावे. देशात जवळपास 2 ते 2.5 कोटी साधू आहेत. जर आम्ही सगळ्यांसाठी समाधी बनविण्याचे ठरवले तर किती जागा लागेल याची कल्पना करता येवू शकते. देशात 20 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. जर प्रत्येकाला दफन केले गेले तर यासाठी जमिन कुठून मिळणार असे साक्षी महाराज म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2017 मध्ये फतेहपूर येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान असाच मुद्दा मांडला होता. “जात आणि धर्माच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाऊ नये, जर एखाद्या गावात दफनभूमी बांधली गेली तर स्मशानभूमी देखील असावी” पंतप्रधान मोदी म्हणाले म्हणाले होते.
हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी स्मशानभूमी आणि दफनभूमीची व्यवस्था लोकांच्या संख्येच्या आधारावर करण्यात यावी असे साक्षी महाराज यांनी सांगितले. सर्व मतदान हे भाजपाचेच आहे, संपूर्ण देश भाजपामय झाला आहे. त्यामुळेच विरोधक रजत आहेत ओरडत असल्याचे असा दावा महाराज यांनी केले. तुम्ही जिथे जिथे जाता तिथे योगी-योगी- आणि मोदी-मोदी अशाच घोषणा ऐकायला मिळतील. मत तर आम्हाला मिळालेलेच आहे फक्त ते बॅलेट मशीनमध्ये टाकायचे आहे असे साक्षी महाराज म्हणाले. भाजपाकडे मतांची कमतरता नाही, असा दावा साक्षी महाराज यांनी यावेळी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 4:53 pm