दिल्लीचे माजी महिला व बालकल्याण मंत्री संदीप कुमार यांना दिल्ली न्यायालयाने रविवारी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संदीप कुमार यांची आक्षेपार्ह सीडी समोर आल्यानंतर ते अडचणीत सापडले होते. आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संदीप कुमार यांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी केली होती. एका महिलेसोबत संदीप कुमार आक्षेपार्ह कृत्य करताना या व्हिडीओत दिसले होते. पक्षातून पायउतार झाल्यानंतर संबंधीत व्हिडिओतील महिला समोर आली आणि संदीपकुमार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेने शनिवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. संदीप कुमार यांनी रेशनकार्ड देण्याचे आमीष दाखवून माझे लैंगिक शोषण केले असा गंभीर आरोप पीडित महिलेने यावेळी केला. दिल्लीतील सुलतानपूरी पोलिस ठाण्यात संबंधीत महिलेने संदीप कुमार यांच्याविरुद्वध तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी रात्री उशिराने दिल्ली  पोलिसांनी संदीप कुमार यांना अटक केली. लैंगिक अत्याचार प्रकराणात अटक करण्यात आलेल्या  संदीप कुमार यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी , अशी मागणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाकडून त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान हे प्रकरण खोटे असल्याचा दावा संदीप कुमार यांच्या पत्नीने केला. संदीप कुमार यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या पत्नी देखील न्यायालयात उपस्थित होत्या. आपल्या पतीविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याची प्रतिक्रिया संदीप कुमार यांच्या पत्नी रितू यांनी यावेळी दिली.