राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते येत्या २६ मे रोजी नरेंद्र मोदी देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असून, या सोहळ्यासाठी देश-विदेशातील तीन हजारांहून अधिक पाहुण्यारावळ्यांना निमंत्रण धाडण्यात आले आहे. विशेष म्हणजे  ‘सार्क’ सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांनाही ‘मोदींच्या शपथविधीला यायचं हं!’ असे आग्रहाचे खास आवतणही पाठविण्यात आले आहे. पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राष्ट्रपती भवनात पार पडणारा हा सोहळा मोदी यांच्या निवडणूक विजयाइतकाच भव्य आणि प्रेक्षणीय व्हावा असा चंगच भाजपने बांधला असून, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाची ‘शोभा’ वाढावी याकरिता मोदी यांच्या वतीने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना खास आमंत्रणे गेली आहेत. या तिघांव्यतिरिक्त अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमिद करझाई, भूतानचे पंतप्रधान त्सेरिंग टोबगे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला आणि मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांनाही आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले आहे. करझाई, राजपक्षे आणि टोबगे यांनी उपस्थित राहण्याविषयी अनुकूलता दर्शविली आहे. मात्र इतक्या अल्पावधीत दौरा आखणे कठीण असल्यामुळे शरीफ या समारंभास उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे समजते. अर्थात पाकिस्तान आपला खास प्रतिनिधी समारंभास पाठविणार आहे.
शरीफ यांना मोदी यांनी आमंत्रित केल्याने शिवसेनेसारख्या मित्रपक्षांना काय वाटले हे अद्याप जाहीर झाले नसले, तरी काश्मीरमधील सर्वच पक्ष तसेच बंडखोर गट मात्र आनंदले आहेत. भारत-पाकिस्तान संबंधांची खुंटलेली वाटचाल पुन्हा चालू होईल, अशी अपेक्षा जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती आणि हुरियतच्या मवाळ गटाचे नेते मिरवैज उमर फारूक यांनी व्यक्त केली आहे.
*सार्क अर्थात ‘साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन’ या संघटनेत सध्या भारतासह अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला देश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका असे आठ सदस्य आहेत.
*निरीक्षक असलेल्या चीनलाही सदस्य व्हायची इच्छा आहे. पाकिस्तानचा या मागणीला पाठिंबा आहे. मोदी यांच्या निवडीबद्दल चीनने आनंद व्यक्त केला असून भारत-चीन व्यापारात वाढ अपेक्षिली आहे.
*म्यानमारही निरीक्षक म्हणून सार्कमध्ये असून त्यांनाही सदस्यत्व हवे आहे.
*रशियाला निरीक्षक म्हणून सार्कमध्ये सहभागी व्हायची इच्छा आहे.
*अमेरिका निरीक्षक पदी असून मोदी यांच्या निवडीनंतर भारताशी संबंध दृढ करण्याची इच्छा बराक ओबामा यांनी सर्वप्रथम व्यक्त केली होती.
मोदी यांचा हा अत्युत्तम निर्णय आहे. अर्थात समजा काँग्रेस सत्तेत आली असती आणि त्यांनी शरीफ यांना आमंत्रित केले असते, तर भाजपची प्रतिक्रिया काय असती, हा प्रश्नच आहे.
– ओमर अब्दुल्ला

हा निर्णय म्हणजे सुखद आणि अनपेक्षित धक्का आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शपथविधीस आमंत्रण देणारे मोदी पहिलेच पंतप्रधान आहेत.
– मेहबूबा मुफ्ती

शपथविधीस कोणाला बोलवावे, हा सर्वस्वी नव्या सरकारचा विशेषाधिकार आहे. त्यात पाठिंबा देण्यासारखे वा विरोध करण्यासारखे काही नाही.
अभिषेक सिंघवी, काँग्रेस</p>