सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनमधील बंडखोरांवर हवाई हल्ले केले असून त्यात सना  शहरात १५ बंडखोर मारले गेल्याचा दावा करण्यात आला. तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी बॉम्बहल्ल्यांनी नष्ट करण्यात आली. दरम्यान, येमेनमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी  प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
संघर्षग्रस्त येमेनमधून संयुक्त राष्ट्रांनी त्यांचे २०० कर्मचारी काढून घेतले आहेत त्याचबरोबर पाकिस्तानही त्यांच्या नागरिकांना मायदेशी  आणणार आहे. दरम्यान अध्यक्ष अबेड्राबो मनसौर हादी यांनी येमेनमधील बंडखोर हे इराणचे बाहुले असून त्यांचे कंबरडे मोडेपर्यंत सौदी अरेबियाने हल्ले करावेत असे म्हटले आहे.
लागोपाठ चौथ्या रात्री शिया बंडखोरांवर हल्ले करण्यात आले असून माजी अध्यक्ष अली अब्दुल्ला सलेह यांची समर्थक दले यांचीही त्यात हानी झाली आहे. बंडखोरांच्या ताब्यातील विमानतळावर बॉम्बहल्ले करून सौदी अरेबियाने बंडखोरांचा कणाच मोडण्याचा प्रयत्न केला.
सनामधून संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढून घेतल्यानंतर धावपट्टीवर हल्ला केला असून या विमानतळावरून आता विमाने उडू शकणार नाहीत. मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या हल्ल्यात मोठ्या आगीच्या ज्वाळा व स्फोटांचे तीन आवाज आले. अल सुबाहा विमानतळावरील हल्ल्यात १५ सैनिक ठार झाले.
बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या हुदैदा विमानतळावरही हल्ले करून सुरक्षा यंत्रणा नष्ट करण्यात आली. सादा येथील तोफखाना ब्रिगेड हा हुथी शिया बंडखोरांचा बालेकिल्ला होता तेथेही हल्ले करण्यात आले.