सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) नेता मोहम्मद शहाबुद्दीन याचा जामीन रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शहाबुद्दीन याला शरण येण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयास राजीव रोशन हत्या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करण्यास सांगितले आहे. राजीव रोशन खूनप्रकरणी शहाबुद्दीन यांना पाटणा उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. हा जामीन रद्द करावा यासाठी राजीव रोशन यांचे वडील चंद्रकेश्वर प्रसाद (चंदा बाबू) यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. दरम्यान शहाबुद्दीन याने कोर्टासमोर समर्पण केले आहे.
शहाबुद्दीन याच्यावर ४० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका खून प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने शहाबुद्दीनला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षविरोधात शहाबुद्दीनने उच्च न्यायालयात अपील केले आहे.
सिवान येथील चंदाबाबू यांचे तीन मुले राजीव, गिरीश आणि सतीश यांचा खून करण्यात आला आहे. त्यांचा मोठा मुलगा राजीव याने आपल्या दोन्ही भावांच्या खून प्रकरणात मुख्य साक्षीदार म्हणून जवाब दिला होता. त्यानंतर राजीव यांचाही खून करण्यात आला होता. राजीव खून प्रकरणात शहाबुद्दीनही आरोपी आहे. शहाबुद्दीन २००५ पासून तुरूंगात आहे. या खटल्याच्या सुनावणीस कनिष्ठ न्यायालयात विलंब होत असल्यामुळे उच्च न्यायालयाने शहाबुद्दीन याला जामीन दिला होता. यापूर्वी न्यायालयाने नितीशकुमार सरकारवर ताशेरे ओढले होते. राजीव रोशनच्या हत्येला १७ महिने होऊनही शहाबुद्दीनवर आरोपपत्र दाखल का करण्यात आला नाही, असा जाब न्यायालयाने सरकारला विचारला होता.
Mohd Shahabuddin surrenders before Siwan District Court in Bihar pic.twitter.com/Mndf3F91VA
— ANI (@ANI) September 30, 2016