पॅन कार्ड, बँक खात्याबरोबरच मोबाइल संलग्नतेसाठीही ३१ मार्चची मुदत

पॅन कार्ड, बँक खाते यांच्या बरोबरच आता मोबाइल क्रमांकांच्या आधार संलग्नतेची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवण्यात येत असल्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकार, तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या खात्यांच्या विविध योजना आधारशी संलग्न करण्यासही हीच मुदत असेल.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निर्णय दिला. घटनापीठात ए. के. सिक्री, ए. एम. खानविलकर, धनंजय चंद्रचूड आणि अशोक भूषण या न्यायमूर्तीचा समावेश होता.

खासगीपणाचा हा घटनात्मकदृष्टय़ा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय घटनापीठने दिला होता. त्यानंतर आधारमुळे या अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या. त्यापैकी काही याचिकाकर्त्यांनी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) अर्थात आधार क्रमांक बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाशी जोडणे घटनाबाह्य़ असल्याचे म्हटले होते. असा विविध योजनांना आधार जोडण्याच्या निर्णयावर स्थगिती आणण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. एस. पुट्टस्वामी यांनीही एक याचिका दाखल केली होती. तिच्यावर शुक्रवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा हंगामी आदेश दिला. तसेच आधार योजनेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या याचिकांवर अंतिम सुनावणी १७ जानेवारी २०१८ रोजी होईल, असेही जाहीर केले. त्याचप्रमाणे प्राप्तिकर कायद्यानुसार आधार आणि पॅन कार्ड जोडण्याचा आणि कर विवरणपत्रे भरताना आधार क्रमांकाचा उल्लेख करण्यास सांगणारा सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला निकाल कायम राहील, असेही स्पष्ट केले. हा आदेश केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व योजना आणि अन्य बाबींसाठी लागू असेल. यापूर्वीच्या बँक खात्यांना आधारशी जोडण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. तर ज्यांना नवी बँक खाती काढायची आहेत त्यांच्यासाठी ही मुदत आणखी पुढे असेल असेही सांगण्यात आले. मात्र त्यांना बँक खाते काढताना आधार कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. तर आधारला मोबाइल क्रमांकाशी जोडण्याबाबतच्या यापूर्वीच्या आदेशान न्यायालयाने सुधारणा केली आणि ती मुदत पूर्वीच्या ६ फेब्रुवारी २०१८ या तारखेवरून ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली.

काय होणार?

पॅन कार्ड, बँक खाते, मोबाइल क्रमांकांच्या आधार संलग्नतेची मुदत आता ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली. केंद्र आणि राज्य सरकार, तसेच सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या खात्यांच्या विविध योजना आधारशी संलग्न करण्यासही आता हीच वाढीव मुदत.