व्यापम घोटाळ्यातील ज्या प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे त्याबाबत आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी विशेष तपासपथकाला द्यावी या सीबीआयने केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य केले.
सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या पीठाने सुनावणी २० जुलै रोजी घेण्याचे मुक्रर केले असून संबंधित पक्षकारांना अर्जाच्या प्रती देण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. व्यापम घोटाळ्यातील १८५ हून अधिक प्रकरणे विशेष तपास पथकाकडून सीबीआयकडे वर्ग करण्यास वेळ लागेल. त्यामुळे ज्या प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली असेल त्याबाबत राज्य तपास यंत्रणांना आरोपपत्र दाखल करण्याची अनुमती द्यावी, अन्यथा नियोजित कालावधीत आरोपपत्र दाखल केल्याचा फायदा आरोपीला जामीन मिळविण्यासाठी होईल, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मणिंदरसिंग यांनी न्यायालयात सांगितले.
‘जागल्या’च्या अर्थाबाबत शिवराजसिंह अनभिज्ञ -दिग्विजयसिंह
भोपाळ- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना ‘जागल्या’ या शब्दाचा अर्थच माहिती नसल्याचे काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. याबाबतची चौहान यांची प्रस्तावित यात्रा घोटाळ्यात सहभाग असणाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. व्यापम घोटाळ्याविरुद्ध राज्यव्यापी बंद पुकारून काँग्रेसने भाजप सरकारविरुद्धचा प्रचार अधिक तीव्र केला आहे. दरम्यान, चौहान यांच्या राजीनाम्यासाठी बंद पाळण्याचे आवाहन दिग्विजयसिंह व अन्य नेत्यांनी बाजारपेठेत फेरफटका मारून केले.ज्या मध्यस्थांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांना आमिष दाखविले त्यांना अटक करण्याऐवजी सरकारने सदर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाच अटक केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.