चीनबरोबर उत्तर व उत्तर-पूर्व सीमेवर सातत्याने निर्माण होत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मॉस्कोमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी चीनला कडक इशारा दिल्याचे दिसून आले. क्षेत्रीय स्थिरतेबरोबच शांततेसाठी आक्रमक धोरण संपुष्टात आणणे आवश्यक आहे. भारत दहशतवादाची व जे दहशतवादाचे समर्थन करतात अशांची निंदा करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

मागील काही दिवसांत चिनी सैन्यांच्या सुरू असलेल्या कुरापतींवरही राजनाथ सिंह यांनी यावेळी निशाणा साधला. ” शांतता, स्थिरता आणि सुरक्षेसाठी विश्वासाचे वातावरण, गैर-आक्रमकता आणि एकमेकांबद्दल संवेदनशीलता महत्त्वाचे आहे. दहशतवादी प्रचाराला सामोरे जाण्यासाठी आणि कट्टरपंथी वातावरण दूर करण्यासाठी दहशतवादविरोधी यंत्रणा स्वीकारणे हा मोठा निर्णय आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.

चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे यांनी भारताबरोबर बैठकीसाठी विनंती केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे संरक्षणमत्री वेई फेंघे यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागितला आहे. मात्र, अद्यापपर्यंत भारताकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. दोन्ही देशांमध्ये मे महिन्यापासून सीमावादाला सुरूवात झाली, ज्यानंतर जून व ऑगस्टमध्ये दोन वेळा दोन्ही देशाचे सैन्य समोरासमोर आले होते. जूनमध्ये उफळलेल्या वादात भारताचे २० जवान शहीद झाले होते, तर चीनकडून  त्यांचे एकूण किती सैनिक मारले गेले हे अद्याप उघड होऊ दिले गेले नाही. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले आहेत.