वॉशिंग्टन : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन व अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जूनमध्ये सिंगापूर येथे झालेल्या पहिल्या बैठकीची फलनिष्पत्ती फार चांगली नसून आता दुसऱ्या भेटीसाठी वाटाघाटी सुरू करण्यात आल्या  आहेत. किम जोंग उन यांनी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांना पत्र पाठवून दुसऱ्या बैठकीसाठी विनंती केली आहे. या प्रस्तावावर विचार करण्यात येत असून या शिखर बैठकीची तयारी सुरू करण्यात आल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.

अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यातील चर्चा जूनमधील ऐतिहासिक भेटीनंतर खुंटली असून अध्यक्ष ट्रम्प यांना किम जोंग उन यांचे पत्र मिळाले आहे. हे पत्र सकारात्मक असून आम्ही हे पूर्ण पत्र जाहीर करू शकत नाही असे व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी मंत्री सारा सँडर्स यांनी सोमवारी सांगितले. अध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर दुसऱ्या बैठकीचे नियोजन करणे हा या पत्राचा हेतू  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांना उत्तर कोरियाची भेट लांबणीवर टाकण्यास सांगितले होते. उत्तर कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करण्यात कुठलीही प्रगती दाखवलेली नाही असे त्यावेळी ट्रम्प यांनी म्हटले होते.

सोमवारी सँडर्स यांनी सांगितले की, किम जोंग उन यांचे पत्र हा दोन्ही देशाच्या नेत्यांमधील संबंधात प्रगती होत असल्याचा पुरावा आहे. दोन्ही नेत्यांत शिखर बैठक व्हावी अशी व्हाइट हाऊसची  इच्छा आहे. किम जोंग यांची संवाद चालू ठेवण्याची इच्छा असून अण्वस्त्रे नष्ट करण्याची वचनबद्धताही कायम आहे.

अलीकडेच लष्करी संचलने करण्यात आल्याने दोन्ही देशातील संबंधात कुठलीही प्रगती झाली नाही हा आरोप सँडर्स यांनी फेटाळला आहे. उत्तर कोरियाचे लष्करी संचलन म्हणजे अण्वस्त्रांचे प्रदर्शन नव्हते असे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षांना त्यांच्या धोरणांमुळे बरेच यश आले असून उत्तर कोरियाने ओलिस ठेवलेल्या काही अमेरिकी लोकांची सुटका करण्यात आली आहे असे त्या म्हणाल्या.