ट्विटरवर काश्मीरमधील परिस्थितीबाबत खोटे मेसेज पसरवण्याच्या आरोपाखाली जम्मू-काश्मीर पिपल्स मुव्हमेंटची नेता आणि जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशीदविरोधात गेल्या आठवड्यातच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सोमवारी दिल्लीच्या कोर्टाने शेहला रशीदला अटकेपासून दिलासा दिला आहे. पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पवन कुमार जैन यांनी शेहलाला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले.

या प्रकरणात सविस्तर चौकशी आवश्यक असल्याचं माझं मत आहे, असं नमूद करताना न्यायाधीश जैन यांनी याप्रकरणाची पुढील सुनावणी पाच नोव्हेंबर रोजी घेतली जाईल असं सांगितलं. याशिवाय पाच नोव्हेंबरपर्यंत शेहलाला अटक केली जाऊ नये असे आदेशही दिले. तसंच, चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आणि अधिकारी जेव्हा चौकशीसाठी बोलावतील तेव्हा हजर राहण्याचे आदेश शेहलाला दिले. ‘द वायर’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर ट्विटरवर काश्मीरच्या परिस्थितीबाबत खोटे मेसेज पसरवल्याचा आरोप शेहलावर आहे. “लष्कराचे जवान रात्रीतून नागरिकांच्या घरात घुसून तरुणांना उचलून घेऊन जातायेत, घरांमध्ये तोडफोड केली जात आहे. पोलिसांकडे कोणतेही अधिकार नसून केवळ लष्कराचा मनमानी कारभार सुरू आहे. रात्रीतून लष्कराचे जवान शोपियांच्या लष्करी तळामध्ये चार जणांना घेऊन गेले आणि त्यांना चौकशीच्या नावाखाली टॉर्चर करण्यात आलं. त्यांच्याजवळ एक माइक ठेवण्यात आला, जेणेकरुन सर्व परिसरात त्यांच्या किंकाळ्या ऐकायला जाव्यात आणि दहशत पसरावी, परिणामी सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे”. असा आरोप शेहला रशीदने ट्विटरद्वारे केला होता.

त्यावर, सर्व आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असून हिंसा भडकविण्यासाठी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या विरोधकांकडून पसरवल्या जात आहेत, असं स्पष्टीकरण लष्कराने दिलं होतं. लष्कराच्या उत्तरानंतर, आपण ट्विटरवर सांगितलेल्या घटना स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीआधारे असल्याचं स्पष्टीकरण शेहलाने दिलं होतं. यानंतर, शेहला रशीद यांनी केलेले आरोप चुकीचे व बनावट असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील वकील आलोक श्रीवास्तव यांनी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास विशेष विभागाकडे दिला होता, त्यानंतर आता रशीद यांच्यावर भादंवि कलम १२४ (ए) अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.