१२ ते १८ ऑगस्ट या काळात राष्ट्रीय स्मारकांसमोर सेल्फी काढण्यावर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांना याबाबतची सूचना जारी केली. स्वातंत्र्य दिन आणि भारत पर्व या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या काळात ही बंदी घालण्यात आल्याचे पर्यावरण मंत्रालयाच्या सूचनेत म्हटले आहे.
आता ‘सेल्फी डेंजर झोन्स’..
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने पुलांवर, डोंगरदऱ्यांवर, घाटांवर, किल्ल्यांवर आणि समुद्रकिनाऱ्यांवर सेल्फी धोकादायक क्षेत्राचे (‘सेल्फी डेंजर झोन’) इशारे देणारे फलक लावण्याचा मानस व्यक्त केला होता. लोकसभेतही सेल्फी काढण्याच्या नादात होणाऱ्या वाढत्या अपघाती मृत्यूंचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सेल्फीच्या नादात जीव जात असल्याने सेल्फी काढण्यासाठी धोकादायक असलेले विभाग (सेल्फी डेंजर झोन) जाहीर करण्याचा केंद्राचा काही इरादा आहे का, असा त्यांचा सवाल होता. त्यावर सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. महेश शर्मा यांनी हा अधिकार राज्यांचा असल्याचे उत्तर दिले. त्याच वेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने सेल्फीमुळे होणाऱ्या अपघातस्थळांच्या संभाव्य ठिकाणी सेल्फी काढण्याबाबतचे इशारे देणारे फलक लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. मुंबईसह मुरुड, लोणावळा, खंडाळा यांसारख्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमाविल्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत घडलेल्या आहेत. भोपाळ येथील क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात क्रीडापटू पूजा कुमारी हिचा सेल्फी काढताना तोल जाऊन नुकताच मृत्यू झाला होता.