सहकारी महिलांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपानंतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील दिग्गज कंपनी इन्फोसिस टेक्नोलॉजीमधील एका वरिष्ठ अधिकाऱयावर कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने अधिकृतपणे याबाबत काहीही सांगितले नसले, तरी अनधिकृतपणे कारवाईच्या माहितीला दुजोरा दिला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
कंपनीतील वरिष्ठ अधिकारी महिला कर्मचाऱयांचा लैंगिक छळ करीत असल्याचा अनामिक मेल कंपनीतील उच्च अधिकाऱयांपर्यंत पाठविण्यात आला होता. त्यानंतर या मेलची दखल घेऊन योग्य चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. कोणत्या वरिष्ठ अधिकाऱयावर ही कारवाई करण्यात आली, याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, कंपनीतील अधिकाऱयांनी त्या अनामिक मेलमध्ये लैंगिक छळाची तक्रार करण्यात आली नव्हती, असा दावा केला आहे. लैंगिक छळाची प्रत्येक तक्रार कंपनी गांभीर्याने घेत असून, त्याची सखोल चौकशी केली जाते. गरजेप्रमाणे दोषींवर योग्य कारवाईही केली जाते, असे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कंपनीतील लैंगिक छळाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्याआधारे व्यवस्था तयार करण्यात आली आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले.