ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला ‘ब्रेक्झिट’ करार हा ब्रिटिश संसदेतील खासदारांनी फेटाळून लावला आहे. मंगळवारी ब्रिटनच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात या संदर्भात मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत ४२३ मते ही कराराच्या विरोधात पडली तर २०२ मते ही कराराच्या बाजूने असल्याचे दिसून आले.

सुमारे अडीच वर्षांपूर्वी ब्रिटनच्या जनतेने युरोपियन युनियन सोडण्याचा कल दिला होता. त्यानुसार २९ मार्च २०१९ रोजी युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडणार, असे निश्चित झाले होते. पण त्याआधीच ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. ब्रिटनने ‘लिस्बन’ कराराचे ५० वे कलम लागू करून ‘ब्रेक्झिट’च्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचे उर्वरित युरोपीय महासंघाशी सलोख्याचे संबंध  टिकून राहावेत, यासाठी करार केला जात आहे. ब्रुसेल्स परिषदेत युरोपियन युनियन नेत्यांनी ब्रेक्झिटला संमती दिली. युरोपियन युनियनच्या मान्यतेनंतर आता या कराराला ब्रिटनच्या संसदेची मंजुरी मिळणं अनिवार्य आहे. परंतु, ब्रिटनमधील अनेक खासदारांनी या कराराला विरोध दर्शवल्याने ब्रेक्झिटचा प्रश्न आणखी चिघळण्याची लक्षणे दिसत आहेत.  मंगळवारी झालेल्या मतदानात तर हा करार फेटाळून लावण्यात आला आहे.