टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते. या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत नागरिक सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या शाहीन बागमधील आंदोलनाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिल्किस आजींचा (दादी) समावेश करण्यात आला आहे. आपले नाव जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये झळकल्याबद्दल बिल्किस यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मला माझ्या मुलासारखेच आहेत. त्यांनी मला भेटण्यासाठी बोलवल्यास मी नक्की त्यांची भेट घेईल असंही बिल्किस म्हणाल्या आहेत.

मागील वर्षी संसदेत नागरिक सुधारणा कायदा संमत झाल्यानंतर देशामध्ये या काद्याला विरोध करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. दिल्लीतील शाहीन बागमध्ये झालेल्या आंदोलनाचे वृत्तांकन तर जगभरातील प्रसारमाध्यमांनी केलं. या आंदोलनाचे वैशिष्ट्य हे होतं की आंदोलनातील बहुसंख्य आंदोलक या महिला होत्या. “थंडी, ऊन आणि पावसातही आम्ही आंदोलन सुरु ठेवलं होतं. जामियामध्ये आमच्या मुलांवर हल्ला करण्यात आला तेव्हाही आम्ही आंदोलन सुरुच ठेवलं होतं. आमच्यासमोर गोळ्या चालवण्यात आल्या तरी आम्ही मागे सरलो नाही,” अशा शब्दांमध्ये बिल्किस यांनी शाहीन बाग आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. सीएएच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे करण्यात आलेल्या आंदोलनात ८२ वर्षीय बिल्किस यादेखील आंदोलक म्हणून त्य़ा ठिकाणी होत्या. कोणी गोळीही चालवली तरी एक इंचही मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

आणखी वाचा- CAA विरोधी आंदोलनातील चेहरा टाइम्स मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत

बिल्किस दादी यांना प्रसारमाध्यमांनी यावेळी पंतप्रधान मोदींनी आमंत्रण दिल्यास त्यांना भेटायला जाल का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “मी नक्की जाईल. त्यात घाबरण्यासारखं काय आहे”, असा उलट प्रश्न पत्रकारांना विचारला. पुढे बोलताना त्यांनी मोदीजी मला मुलासारखे आहेत. मी त्यांच्या आईसारखीच आहे आणि ते मला माझ्या मुलांप्रमाणेच आहेत. टाइमच्या प्रभवाशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते.

बिल्किस दादींबरोबरच या यादीत गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता यांच्या नावाचाही यात समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्च व्यक्त केलं आहे.