रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तिकांत दास माजी अर्थ सचिव आहेत. सध्या ते अर्थ आयोगाचे सदस्य आहेत. काल उर्जित पटेल यांनी तडकाफडकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली होती.

त्यानंतर उर्जित पटेल यांची जागा कोण घेणार याबद्दल विविध तर्क-वितर्क लढवण्यात येत होते. माजी अर्थ सचिव असलेल्या शक्तिकांत दास यांची तीन वर्षांसाठी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वैयक्तिक कारणांमुळे मी हे पद सोडतो आहे असे उर्जित पटेल यांनी राजीनामा देताना म्हटले होते. केंद्र सरकार आणि आरबीआय वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. आरबीआयमध्ये गव्हर्नर पदावरा काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. आरबीआयच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करणं हा माझ्यासाठी गौरव होता. मी माझ्या सहकाऱ्यांचे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो त्यांनी मला खूप सहकार्य केले असे उर्जित पटेल यांनी म्हटले होते.