अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधून होणार आहे. याच नियोजित दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना टोला लगावला आहे. तसेच ट्रम्प यांना झोपड्या दिसू नये म्हणून बांधण्यात येणाऱ्या भिंतीच्या विषयावरुनही पवारांनी पत्रकारांना मजेशीर प्रतिप्रश्न विचारला.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून…

“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे २४ फेब्रवारीपासून भारत दौऱ्यावर येत असून ते अहमदाबादपासून आपली यात्रा सुरु करणार आहेत. ते आग्र्यालाही जाणार आहेत, याबद्दल तुमचे मत काय आहे?,” असा प्रश्न मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी मोदी पंतप्रधान झाल्यापासून परदेशातील महत्वाचे नेते अहमदाबादमध्येच जात असल्याचा टोला लगावला आहे. “पाच वर्षांपासून म्हणजेच मोदी पंतप्रधान झाल्यापासून परदेशातील महत्वाचे नेते अहमदाबादमध्येच जाताना दिसत आहेत. आधी परदेशातील मोठे नेते यायचे तेव्हा ते दिल्ली, मुंबई, आग्रा, हैदराबादसारख्या शहरांमध्ये जायचे. मात्र आता मोदींना केवळ अहमदाबादच दाखवावस वाटतं आहे याचा आनंद आहे,” असा टोला पवारांनी मोदींना लगावला.

मोदींनी झोपड्या पाहिल्या तर…

पत्रकारांनी याच मुद्द्यावरुन अहमदाबादमधील झोपडपट्ट्या दिसू नयेत म्हणून बांधण्यात येणाऱ्या भिंतीसंदर्भात पवारांना मत विचारलं. त्यावेळी पवारांनी पत्रकारांचीच मजेशीर फिरकी घेतली. “असा कसा प्रश्न विचारु शकता तुम्ही. ट्रम्प यांनी झोपड्या पाहिल्या तर ते अमेरिकेत जाऊन गुजरातबद्दल काय सांगतील. त्यामुळे ते यायच्या आधी भिंत उभारली जात आहे, रंगरंगोटी केली जात आहे. यात प्रश्न विचारण्यासारखं काय आहे. तुम्हाला कळतच नाही,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया पवारांनी हसत हसतच दिली.

भिंत का बांधणार?

ट्रम्प यांच्या मार्गातील झोपड्या त्यांना दिसू नयेत म्हणून एक भिंत उभारण्यात येते आहे. अहमदाबाद महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आणि इंदिरा ब्रिज या भागातील झोपड्या ट्रम्प यांच्या ताफ्याच्या नजरेस पडू नयेत म्हणून ही भिंत उभारण्यात येत आहे. याच भागामध्ये ट्रम्प आणि मोदींचा एक रोड शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मार्गातल्या झोपड्या लपवण्यासाठी भिंत बांधली जाते आहे.