शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नोटाबंदीवरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी पूर्वी जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ले बंद केले पाहिजेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. जम्मू काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले अजूनही सुरूच असून त्यावर प्रथम कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी त्यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावरही टीका केली. तसेच भाजपला नगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश म्हणजे नोटाबंदीला पाठिंबा नव्हे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री सभेत बोलताना म्हणाले होते की, पाकिस्तानने जर भारताकडे डोळेवर करून पाहिले तर त्यांचे डोळे काढून हातात देऊ. जेव्हा त्यांनी असं म्हटले होते, तेव्हा माझी छाती गर्वाने फुगली होती. आज जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. त्यात आपले जवान शहीद झाले. आता संरक्षण मंत्र्यांनी आपल्या सैन्याला म्हटले पाहिजे, जा आणि पाकिस्तानच्या सैन्याचे डोळे काढून आणा. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही संरक्षणमंत्र्यांना तसे आदेश द्यावेत, असे ते म्हणत जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सूरूच असून हे हल्ले कसे कमी होतील याकडे केंद्राने लक्ष दिले पाहिजे, असा सल्लाही दिला.
महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकीत भाजपला यश मिळाले म्हणजे तो काही नोटाबंदीला पाठिंबा आहे, असे कोणी समजू नये. जर लोकांचा याला पाठिंबा असला असता तर सर्वच्या सर्व जागा भाजपला मिळायला हव्यात.