देशात एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांनाच देणारं १२७वं घटनादुरुस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झालं असून त्यावर आज बुधवारी राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करतानाच सत्ताधारी भाजपाला खोचक टोला देखील लगावला. “चूक झाल्यानंतर तिचा इव्हेंट कसा करावा आणि चूक सुधारल्यानंतर त्याचा उत्सव करण्याचाही इव्हेंट कसा करावा, हे सरकारकडून शिकायला हवं. चुकीचाही उत्सव आणि चूक सुधारण्याचाही इव्हेंट, एवढा कॉन्फिडन्स सरकारकडे येतो कुठून?” असा खोचक टोला संजय राऊत यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपाला लगावला आहे.

“सरकार आपलीच पाठ थोपटत होतं”

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना १०२व्या घटनादुरुस्तीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. “२०१८मध्ये १०२व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागास आयोगाला अधिकार दिल्यामुळे सर्व राज्यांचे अधिकार केंद्राला आले. तेव्हाच सगळ्यांनी इशारा दिला होता की इतके सगळे अधिकार तुम्ही एका केंद्रीय आयोगाला देऊ नका. पण सरकारने तेव्हा चूक केली होती आणि चूक झाल्यानंतर देखील सरकार आपलीच पाठ थोपटत होतं”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“मराठा, धनगर समाजासाठी भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं प्रेम आहे”, शिवसेनेनं सुनावलं!

…आणि सभागृहात हास्याची लकेर उमटली!

“चुकीचा इव्हेंट कसा करावा आणि मग चूक सुधारल्यानंतर त्याचा उत्सव करण्याचा इव्हेंट हे सरकारकडून शिकायला हवं. एवढा आत्मविश्वास सरकारकडे कुठून येतो. जर इतका आत्मविश्वास असेल, तर थोडा आम्हालाही उधार द्या. इथेही आत्मविश्वासाची गरज आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधी बाकांच्या दिशेने इशारा करताच सभागृहात हास्याची लकेर उमटली!

लोकसभा मुदतीआधीच अनिश्चित काळासाठी स्थगित; काँग्रेस नेत्यांचे टीकास्त्र

“आमच्या हाती कधी तागडी-तराजू नाही आला”

“महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आपल्या हातात नेहमीच देशाच्या संरक्षणासाठी तलवार किंवा बंदूक राहिली आहे. हेच आमचं काम राहिलं आहे. आमच्या हातात कधी तागडी-तराजू नाही आला, ना कधी चोपडी आली. आम्ही तर लढत राहिलो. सामाजिक न्यायाची अपेक्षा ठेऊन आम्ही आज उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराजांनी आपलं राज्य असलेल्या कोल्हापुरात सामाजिक न्याय स्थापिक करण्यासाठी या देशात सर्वात आधी पाऊल उचललं होतं”, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

“१२७व्या घटनादुरुस्तीचं विधेयक अर्धवट आहे. या विधेयकात दुरुस्तीनंतर देखील आरक्षणावर ५० टक्क्यांची जी मर्यादा आहे ती ३० वर्षांपूर्वीची आहे. ती वाढवली नाही, तर आज दुरुस्ती केली आहे, उद्या अजून काही बदल केला जाईल. आमचे छत्रपती संभाजी राजे आंदोलनाचे नेते आहे. त्यांचंही हेच मत आहे. देशभरातील ओबीसीमधले लाखो युवक आपल्याकडे बघत आहेत”, असं देखील राऊत म्हणाले.