शॉप क्लूज आणि ड्रूमचे संस्थापक संदीप अग्रवाल यांनी त्यांच्या पत्नी आणि सहसंस्थापकाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. पत्नी आणि सहसंस्थापकाने आपली भूमिका कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संदीप अग्रवाल यांनी केला आहे. फेसबुकवरील अनेक पोस्टनंतर अग्रवाल यांनी हे पाऊल उचलले आहे. फेसबुक पोस्टमधून संदीप अग्रवाल यांनी पत्नी राधिका आणि संजय सेठी यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्नीने दगा दिल्याचा आरोपदेखील अग्रवाल यांनी फेसबुक पोस्टमधून केला आहे. मात्र यानंतर त्यांनी त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट केली आहे.

‘तुझी पहिली कंपनी माझी आणि मी निर्माण केली होती. तुझी दुसरी कंपनीदेखील माझी होती. ज्या मुलांना आपण जन्म दिला, ते देखील माझे आहेत आणि सर्वकाही जे तू केले आहेस, तेदेखील माझे आहे. सर्वकाही माझे आहे. मी सुपर वुमन आहे आणि कोणालाही मूर्ख बनवू शकते. हे सर्व जग मी निर्माण केले आहे आणि कोणीच माझ्यासमोर टिकू शकत नाही. माझ्या प्रियकराने तुला मारण्याची धमकी दिली होती आणि मी त्याच्यासोबत त्यावेळी पाच तास पोलीस ठाण्यात उपस्थित होते. तुला अजूनही का कळत नाही की आपल्यात आता काहीही शिल्लक राहिलेले नाही. मात्र काहीच नसताना तू जे सर्वकाही निर्माण केले आहेस, ते माझे आहे. हे मान्य कर की हे सर्वकाही माझे आहे. तुला तर श्वास घेण्याचादेखील अधिकार नाही. तू २० वर्षे कोणत्याही अपेक्षेविना माझ्यावर प्रेम केलेस. आता त्याची किंमत मोज,’ असे संदीप अग्रवाल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संदीप अग्रवाल यांच्याकडून त्यांच्या पोस्टबद्दल माफी मागण्यात आली आहे. ‘संदीपने ज्या लोकांवर विश्वास ठेवला, त्याच लोकांनी अनेकदा त्याचा विश्वासघात केला आहे. तो खूप दु:खी आहे आणि त्याच्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे. सार्वजनिक जागी भावनात्मक होऊन राग व्यक्त केल्याबद्दल त्याला वाईट वाटते. त्याने आयुष्यातील प्रेम असलेल्या शॉपक्लूजला गमावले आहे. तो आपल्या मुलांनादेखील पाहू शकत नाही. त्यामुळेच तो भावूक झाला,’ अशा शब्दांमध्ये फेसबुक पोस्टबद्दल माफी मागण्यात आली आहे.

शॉपक्लूजची स्थापना २०११ मध्ये झाली. २०१४ मध्ये संदीप शॉपक्लूजमध्ये सल्लागार झाले आणि त्यांनी ड्रूम या दुसऱ्या स्टार्टअपची सुरुवात केली. मात्र आता संदीप यांनी त्यांच्या पत्नीवर विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच राधिका यांनी त्यांच्या योग्यतेबद्दल आणि शिक्षणाबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला आहे. संदीप अग्रवाल यांच्या आरोपांबद्दल आणि मानहानीच्या खटल्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे शॉपक्लूजने म्हटले आहे. तर राधिका यांनी संदीप अग्रवाल यांचे आरोप तथ्यहीन आणि तर्कहीन असल्याचे म्हटले आहे.