यंदाच्या वर्षी दहशतवादी हल्ल्यात मोठी वाढ होणार असून त्यांचे स्वरूपही बदलणार आहे, छोटय़ा स्वरूपाचे हल्ले तसेच एकाने येऊन केलेले हल्ले (लोन वूल्फ अ‍ॅटॅक) असे त्यांचे स्वरूप असणार आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या दहशतवाद तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात सिडनी येथे घडलेले ओलिस नाटय़ व पॅरिस व बेल्जियम येथे झालेले हल्ले हे त्याचेच निदर्शक आहेत.
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे क्लार्क जोन्स यांनी सांगितले, की हिंसक अतिरेक्यांची भीती कायम आहे व ते हल्ले करू शकतात. या वर्षी दहशतवाद जास्त वाढणार आहे व छोटय़ा स्वरूपाचे हल्ले केले जातील.
जोन्स हे ऑस्ट्रेलियाच्या फर्स्ट सेंटर फॉर इंटरव्हेन्शन अँड काउंटरिंग व्हायोलंट एक्स्ट्रिमिझम या संस्थेचे सदस्य आहेत.
दहशतवाद बदलत असून गेल्या बारा महिन्यांत आपण त्यातील बदल पाहिले आहेत. आपण पूर्वी जेथे होतो त्याच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी आहोत. कुठलीही एक व्यक्ती वेगळी असून शकते कारण तिचा मार्ग मूलतत्त्ववादाचा असू शकतो, असे त्यांनी एबीसीला सांगितले. यात सामाजिक कार्यकर्ते, मानसशास्त्रज्ञ ही स्थिती समजू शकतात व मूलतत्त्ववादाचा प्रसार कसा होत चालला आहे, त्या परिस्थितीवर प्रकाश टाकू शकतात. मूलतत्त्ववादाच्या स्वरूपानुसार व्यक्ती त्यात सामील होऊ शकतात, असे मानसशास्त्रज्ञ व इतरांचे म्हणणे आहे. जोन्स यांनी सांगितले, की लोकांना तुरुंगात टाकणे हे त्यावर उत्तर नाही तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो.
जन्माने इराणी असलेला बंदूकधारी हॅरॉन मोनिस याने सिडनीत डिसेंबरमध्ये तीन जणांना ठार केले इतर चार जण जखमी झाले. त्यानंतर पॅरिसमध्ये ‘शार्ली हेब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला. त्यात व्यंगचित्रकारांसह बारा जण ठार झाले, दुसऱ्या दिवशीच्या हल्ल्यात पाच जण ठार झाले. बेल्जियममध्ये दोन संशयित दहशतवादी ठार झाले.
ऑस्ट्रेलियाच्या सरकारने दहशतवादाशी लढण्याकरिता ६३० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरची घोषणा केली आहे. हिंसक दहशतवादासाठी १३.४ दशलक्ष डॉलरची तरतूद केली आहे. लोकांना हिंसाचार व द्वेषापासून दूर काढण्यसाठी रोजगार, शिक्षण, समुपदेशन असे अनेक मार्ग उपलब्ध करून दिले जातील, असे महाधिवक्ता जॉर्ज ब्रँडिस यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या संघराज्य पोलिसांनी सांगितले, की किमान ८० पासपोर्ट रद्द करण्यात आले असून अनेक ठिकाणी मूलतत्त्ववाद्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. काही ऑस्ट्रेलियन लोक इस्लामिक स्टेटच्या लढाईत सामील झाले आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

* दहशतवादात आता छोटे गट किंवा एका व्यक्तीकडून हल्ले
* ऑस्ट्रेलियाची  ६३० दशलक्ष डॉलरची तरतूद.
*  लोकांनी मूलतत्त्ववादाकडे वळू नये यासाठी त्यांना रोजगार, शिक्षण व समुपदेशन या सुविधा देणार.