अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात चीनने गाव वसवल्याचं धक्कादायक वृत्त समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशमधील भाजपा खासदार तापिर गाओ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “राजीव गांधींच्या काळापासून म्हणजेच ८० च्या दशकापासून चीन भारतीय भूभागावर कब्जा करत आहे.” असं तापिर गाओ यांनी म्हटलं आहे.

“चीनकडून गाव वसवलं जाणं, भारतीय सीमेजवळ सैन्य शिबीर बनवणं हे काही नवीन नाही. ८० च्या दशकापासून आजपर्यंत चीन सातत्याने भारतीय भूभागावर कब्जा करत आहे. आज आपण काँग्रेस सरकारांच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम भोगत आहोत. काँग्रेस सरकारची धोरणं चुकीची होती.”

भाजपा खासदार तापिर गाओ यांनी सांगितले की, “चीन ८० च्या दशकापासून रस्ते तयार करण्याच्या मागे लागला आहे, त्यांनी लोंग्जूपासून माजा पर्यंत रस्ता तयार केला आहे. राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात, चीनने तवांगमध्ये सुमदोरोंग चू घाटीवर कब्जा केला होता. यावर तत्कालीन लष्कर प्रमुखांनी एका ऑपरेशनची योजना देखील आखली होती. मात्र राजीव गांधींनी त्यांना पीएलएला परत पाठवणाऱ्या त्या योजनेवर काम करण्याची परवानगी नाकारली.”

चीनचं धाडस वाढलं! अरुणाचलमध्ये वसवलं गाव; सॅटेलाइट फोटोंमधून आलं समोर

तसेच, “काँगेस सरकारांनी सीमेपर्यंत रस्ते तयार केले नाहीत. यामुळे ३ ते ४ किलोमीटरचा बफर झोन राहिला. या भूभागावर चीनने कब्जा केला. चीनकडून अरुणाचलमध्ये गाव वसवणं काही नवीन नाही. हे तर काँग्रेसच्या काळापासून चालत आलं आहे.” असं देखील खासदार तापिर गाओ यांनी सांगितलं आहे.