आपली उपजत प्रतिभा व त्याच्या जोडीला अभ्यास यातून सतारवादनावर विलक्षण प्रभुत्व असलेले श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान यांचे वयाच्या ७७व्या वर्षी अल्पकालीन आजारानंतर शनिवारी कराची येथे निधन झाले.

रईस खान यांचा जन्म सन १९३९ मधला इंदोरचा. पूर्णत संगीतात बुडालेले असे त्यांचे घर होते. त्यांचे आजोबा इनायत अली खान हे भारतीय उपखंडातील एक अव्वल सतारवादक म्हणून प्रख्यात होते. रईस खान यांनी वडील मुहम्मद खान व चुलते वलायत अली खान यांच्याकडे सतारवादनाचे धडे घेतले. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा पहिला कार्यक्रम मुंबईत केला. सततचा रियाझ व चिंतन यामुळे रईस खान यांनी सतारवादनावर विलक्षण प्रभुत्व मिळवले. हिंदी चित्रपटसृष्टीशीही त्यांचा घनिष्ठ संबंध आला. बहारों मेरा जीवन भी सवांरो.. चंदन सा बदन.. बैय्या ना धरो.. अशा असंख्य गाण्यांमध्ये ऐकू येणारी सतार ही रईस खान यांची आहे. असंख्य सुमधूर गाणी देणारे संगीतकार मदनमोहन यांची कित्येक गाणी रईस खान यांच्या सतारवादनाने अधिक खुलली. रईस खान सन १९६८मध्ये पाकिस्तानला वास्तव्यासाठी गेले. तेथेही त्यांची प्रतिभा बहरत राहिली. गेले काही दिवस ते आजारी होते. शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.