‘सेल’च्या पोलाद प्रकल्पात विषारी वायुची गळती होऊन सहा जण मृत्युमुखी पडल्याच्या दुर्घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फच चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले असतानाच या प्रकल्पाच्या विविध विभागांत काम करणारे आणखी चार कर्मचारी शुक्रवारी आजारी पडल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर चार कर्मचाऱ्यांनी गुदमरल्यासारखे वाटत असल्याच्या तक्रारी केल्याने त्यांना जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल आणि रीसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे पोलीस महानिरीक्षक प्रदीप गुप्ता यांनी सांगितले. मात्र ज्या विभागांत ही दुर्घटना घडली तेथे हे कर्मचारी काम करीत नव्हते, असेही गुप्ता म्हणाले. त्यांच्या आजाराचे निश्चित कारण कळलेले नाही.
या दुर्घटनेत जे बाधित झाले होते त्यांच्या प्रकृतीचा धोका टळल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. या प्रकल्पातून गुरूवारी सायंकाळी कार्बन मोनोक्साइड या विषारी वायुची गळती झाल्याने ३६ जण बाधित झाले होते.
सेलच्या निवेदनात म्हटले आहे की, २१ जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले. आणखी नऊ जणांची प्रकृती स्थिर आहे. गॅस क्लिनिंग प्लांटमधील पाण्याचा दाब पंप हाऊस २ मध्ये झालेल्या स्फोटामुळे अचानक कमी होऊन ही दुर्घटना घडली.
मोदींकडून विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्याशी चर्चा केली आणि परिस्थिती जाणून घेतली. मृतांच्या कुटुंबियांचे मोदी यांनी सांत्वन केले असून आजारी पडलेल्या कर्मचाऱ्यांवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश मोदी यांनी दिले आहेत.
* सेलच्या (स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ) पोलाद प्रकल्पात झालेल्या या वायुगळतीतील मृतांमध्ये दोन उपमहाव्यवस्थापकांसह सहाजणांचा समावेश.
* कामगार कंत्राटदार विकास शर्मा यांचा मृतदेह पंप हाऊसमधील पाणी काढल्यानंतर सापडला.
* दुर्गचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी या घटनेची चौकशी करतील.