वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनापोटी नोव्हेंबरमध्ये एक लाख तीन हजार ४९२ कोटी रुपये जमा झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. जीएसटी संकलनातील वाढीचे हे प्रमाण ६ टक्के आहे.

सणासुदीच्या काळातील मागणीमुळे जीएसटी संकलन वाढल्याचे सांगण्यात येते. जीएसटी संकलन याच महिन्यात गेल्या वर्षी ९७ हजार ६३७ कोटी रुपये होते, तर हे संकलन ऑक्टोबरमध्ये ९५ हजार ३८० कोटी रुपये होते.

ऋण वाढीच्या दोन महिन्यांनंतर जीएसटी महसुलात सुधारणा होऊन नोव्हेंबर २०१९ मध्ये ६ टक्के वाढ झाली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जीएसटी संकलन वाढले याचा अर्थ मागणीत आणि जीएसटी भरणाही वाढला आहे. कठोर पावले न उचलता हे संकलन वाढले आहे.

नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत व्यवहारात जीएसटी संकलन १२ टक्के वाढले असून वर्षांतील हा उच्चांक आहे. नोव्हेंबरमध्ये १,०३,४९२ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले असून केंद्राचा जीएसटी १९,५९२ कोटी रुपये, तर राज्याचा २७,१४४ कोटी रुपये होता. एकात्मिक जीएसटी संकलन ४९,०२८ कोटी झाले. त्यात आयातीवरचा जीएसटी २०,९४८ कोटी रुपये होता. उपकर ७,७२७ कोटी रुपये होता. त्यात ८६९ कोटींचे संकलन आयातीवरचे आहे, असे सरकारी आकडेवारीत म्हटले आहे.

जीएसटी लागू केल्यानंतर एक महिन्यात जास्त संकलन होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल २०१९ आणि मार्च २०१९ मध्ये जास्त जीएसटी संकलन झाले होते. यावर्षी जुलैमध्ये १,०२,०८३ कोटी जीएसटी संकलन झाले होते. नोव्हेंबरमधील संकलनाने त्यापुढील पल्ला गाठला आहे.

आयातीवरील जीएसटी संकलन उणे १३ टक्के आहे. सरकारने केंद्रीय जीएसटीत २५,१५० कोटी, तर राज्य जीएसटीत १७,४३१ कोटींची तडजोड एकात्मिक जीएसटीतून केली आहे. त्यातून केंद्र सरकार आणि राज्यांना नोव्हेंबरमध्ये ४४,७४२ कोटी केंद्रीय जीएसटीतून, ४४,५७६ कोटी राज्य जीएसटीतून मिळाले.

सणासुदीला बाजारपेठांत उत्साह होता. त्यामुळेच एक लाख कोटींचा जीएसटी टप्पा ओलांडला गेला. येत्या महिन्यातही हा कल कायम राहिला तर आर्थिक तूट भरून येण्यास मदत होईल.

– एम.एस मणी, डेलॉइटचे भागीदार