चीनमध्ये करोनाचे सोळा नवीन रुग्ण सापडले असून संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात लक्षणे दाखवणारा एक रुग्ण असून इतर पंधरा लक्षणे न दाखवणारे रुग्ण आहेत.

करोनाचे केंद्र असलेल्या वुहान  येथे संसर्ग असलेला एक समूहगट सापडला असून राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मंगोलिया स्वायत्त प्रदेशात एका रुग्णाची नोंद झाली असून तो परदेशातून आलेला आहे.

चीनमधील तज्ज्ञांच्या मते संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असून दोन प्रांतात करोना  संसर्गाचे दोन समूह सापडले आहेत. अशाप्रकारे काही ठिकाणी संसर्गाच्या घटना आढळणे हे फार वेगळे नाही. चीनमधील दोन प्रांतात करोनाचे रुग्ण पुन्हा सापडण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे भीतीचे वातावरण असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

चीनच्या वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे, की काही नवीन रुग्ण सापडले असले तरी काळजी करण्याचे कारण नाही. वुहान, हुबेई प्रांत व शुलान, जिलीन प्रांतात रुग्ण सापडले असून त्याचा अर्थ संसर्गाची दुसरी लाट सुरूहोईल असा नाही. जिलीन व हुबेई प्रांतात संसर्गाचे समूहगट सापडले असून त्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.