स्मृती इराणी यांचे आव्हान
राजीव गांधी ट्रस्टवर जमीन हडपल्याचे आरोप केल्यानंतर काँग्रेसने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना कायदेशीर नोटीस दिली आहे. इराणी यांनी हे आव्हान स्वीकारले असून राहुल गांधी यांनी आपल्याला तुरुंगात पाठवून दाखवावे, असे सांगत आपण अमेठीच्या लोकांशी थेट बोलणार आहोत असे प्रत्युत्तर दिले.
इराणी यांना २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पराभूत केले आहे. इराणी म्हणाल्या की, अमेठीला आपण वारंवार भेट देत असल्याने काही जण अस्वस्थ आहेत, कायदेशीर नोटिसांना आपण घाबरत नाही. राहुल गांधी यांना या देशातील महिला अबला वाटत असतील तर त्यांनी ते विसरून जावे. आपण त्यांना घाबरत नाही व अमेठीत आवाज उठवत राहणार. जर राहुल व काँग्रेस यांच्यात िहमत असेल तर त्यांनी आपल्याला गजाआड करून दाखवावे. अमेठीचे व आपले नाते निवडणुकीपुरते नाही, असे त्या म्हणाल्या. येथील गुंगवाज खेडय़ात त्यांनी शिवदुलारी महिला महाविद्यालयात रोपांचे वाटप केले.
उत्तर प्रदेश काँग्रेसने इराणी यांना दिल्लीत नोटीस पाठवली आहे, राजीव गांधी ट्रस्टने अमेठीतील शेतकऱ्यांची जमीन हडपली हा आरोप चुकीचा व द्वेषमूलक असल्याचे त्यात म्हटले आहे. इराणी यांनी काँग्रेसविरोधातील गैरआरोप थांबवावेत नाही तर त्यांच्यावर फौजदारी व दिवाणी दावे लावले जातील, असे काँग्रेसने म्हटले आहे.
शिक्षा मित्रांनी त्यांच्या सभेत आज घोषणाबाजी केली तेव्हा इराणी यांनी सांगितले की, राज्य सरकारने शिक्षा मित्रांची माहिती केंद्राकडे पाठवावी अशा सूचना दिल्या आहेत.