केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघास १२ मे रोजी भेट देणार असून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. मात्र ‘फूड पार्क’ प्रकल्प रद्द झाल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी इराणी यांच्या भेटीला विरोध करण्याचे जाहीर केले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या मतदारसंघाकडे १० वर्षे दुर्लक्ष केले, अशी टीका इराणी यांनी केली. त्यानंतर नेहरू-गांधी घराण्याच्या या बालेकिल्ल्यात इराणी सर्व विभागांना भेटी देऊन किसान पंचायत संबोधित करतील, असे भाजपने शनिवारी जाहीर केले. अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या समस्या इराणी जाणून घेणार आहेत.
दरम्यान, अमेठीमधील फूड पार्क प्रकल्प रद्द झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी इराणी यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचे ठरविले आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत फूड पार्कचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप गांधी यांनी केला. मात्र गांधी यांनी सत्तेत असतानाही आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले, असा हल्ला इराणी यांनी चढविला.
केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना २०१० मध्ये फूड पार्कची घोषणा करण्यात आली. त्यानंतर हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याने त्याला आठ वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र हा प्रकल्प वास्तवात येण्यासाठी तेथील खासदारांनी आठ पावले तरी उचलली का, असा सवाल इराणी यांनी राहुल यांना केला होता.