रोहित आत्महत्याप्रकरणी काँग्रेसची टीका; भाजपचे प्रत्युत्तर

एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतांचे पालन करण्याचे ढोंग करणाऱ्या केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या खात्याच्या मंत्री स्मृती इराणी हैदराबाद विद्यापीठ विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात दिशाभूल करण्यासाठी खोटे बोलत असल्याची तोफ काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुर्जेवाला यांनी डागली. विद्यापीठात शिकणाऱ्या रोहित वेमुला या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यानंतर देशभरातून केंद्र सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसकडून दररोज या प्रकरणावर प्रतिक्रिया येत असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विरोधकांचा रोष सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

एक खोटे लपवण्यासाठी इराणी तीन वेळा खोटे बोलल्या, असा आरोप सुर्जेवाला यांनी केला. ते म्हणाले की, इराणी यांच्या दाव्यानुसार प्रोक्टेरिअल मंडळाने हैदराबाद केंद्रीय विद्यापीठास सोपवलेल्या अहवालात दलित विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले होते. तो अहवाल ‘एक्स पार्टी’ होता. परंतु इराणी यांचा दावा खोटा आहे. कारण मंडळाने सर्व तथ्यांची शहानिशा करूनच विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द केले होते. मंडळाने स्वतचा निर्णय बरोब्बर पंधरा दिवसांनी अर्थात ३१ ऑगस्ट २०१५ रोजी बदलला. त्यासाठी इराणी यांनी दबाव आणला होता. त्यांनी वारंवार विद्यापीठास पत्रे लिहिल्याचे सुर्जेवाला यांनी स्पष्ट केले. कार्यकारी परिषदेचे नाव घेऊन इराणी दुसऱ्यांदा खोटे बोलल्याचे सुर्जेवाला म्हणाले. परिषदेने पीएचडी करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचे निलंबन योग्य ठरवले होते. या परिषदेचे अध्यक्ष दलित असल्याचे इराणी म्हणाल्या होत्या. विद्यापीठाच्या एससी-एसटी फोरमने इराणी यांचा दावा खोटा ठरवला आहे. इराणी यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे व कटाचा भाग आहे. तिसऱ्यांदादेखील इराणी खोटे बोलल्या. वसतिगृहाच्या प्रमुखांनी (वॉर्डन) त्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून निलंबित केले होते. हे प्रमुख दलित असल्याचा दावा इराणी यांनी करून निलंबनाचे समर्थन केले. परंतु वसतिगृह प्रमुख स्वत निर्णय घेत नाही. ते केवळ कुलगुरूंच्या निर्णयाची अंमलबजावणी करतात. सुर्जेवाला यांच्या प्रश्नांवर भाजपकडून प्रतिक्रिया आली नाही. इराणी याप्रकरणी स्वतचा बचाव करण्यासाठी वारंवार खोटे बोलत आहेत असा आरोप केला.

काँग्रेसचे द्वेषाचे राजकारण-शर्मा

काँग्रेस याप्रकरणी द्वेषाचे राजकारण करत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. सरकारच्या विकासाच्या धोरणात आडकाठी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप भाजप सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी केला. याप्रकरणी काँग्रेस नेते व्ही. हनुमंतराव यांच्या नोव्हेंबर २०१४ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवलेल्या पत्राचा दाखला त्यांनी दिला. विद्यापीठात तीन सत्रांत सात आत्महत्या झाल्याचे राव यांनी पत्रात नमूद केले होते. या सात विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांत्वन केले नाही. रोहितच्या मृत्यूला जातीय रंग देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका शर्मा यांनी केली.