देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात मागील २४ तासांत ४८ हजार ६६१ नवीन रुग्ण आढळले आहे. मागील चार दिवसांपासून देशात ४५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढत आहे. चार दिवसात जवळपास देशात दोन लाख करोनाबाधित रुग्ण आढळले आहे. देशात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्येही वाड होत आहे. २४ तासांत तब्बल ७०५ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३२ हजार ६३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधित मृत्यूमध्ये भारत जगात सहाव्या स्थानावर पोहचला आहे. असे असले तरी जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर नीचांकी २.३८ टक्के आहे. १० लाख लोकसंख्येमागे ८६४ लोकांना करोनाची बाधा झाली असून २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ इतकी झाली आहे. चार लाख ६ हजार ८८२ जणांवर उपचार सुरु आहेत दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ८ लाख ८५ हजार ५५७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचं देशातील प्रमाण जळपास ६४ टक्के इतके आहे. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात २५ जुलै रोजी चार लाख ४२ हजार २६३ करोना चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंतच्या एका दिवसातील या सर्वाधिक करोना चाचण्या आहेत. आतापर्यंत देशात एक कोटी ६२ लाख ९१ हजार ३३१ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.