अल कायदासारखी दहशतवादी संघटना फेसबुक, यूटय़ूब, इंस्टाग्राम आणि ट्विटर या माध्यमांतून आपली व्याप्ती वाढवत आहे आणि ेसमाजमाध्यमेच (सोशल मीडिया) दहशतवादी संघटनांचे प्रसाराचे प्रमुख साधन बनले आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही ठिकाणी संभाव्य दहशतवादी हल्ला रोखण्याच्या मोहिमेत हा मोठे आव्हान उभे राहिल्याचा निष्कर्ष व्रुडो विल्सन सेंटरच्या डीसी कॉमन्स लॅबने काढला आहे.
अलीकडच्या काळात दहशतवादी संघटना सोशल मीडियाकडे वळल्या आहेत. यात ते फेसबुक, ट्विटर आणि यूटय़ूबचा मोठय़ा प्रमाणावर वापर करत आहेत. सर्वच दहशतवादी संघटना ऑनलाइन बनल्या आहेत आणि ते वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे निदर्शनास झाल्याचे हैफा विद्यापीठाचे माहिती विभागाचे प्राध्यापक गॅ्रबिएल वीमॅन यांनी स्पष्ट  केले.
दहशतवाद्यांच्या दृष्टीने सोशल मीडियाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांना माध्यमांमध्ये निनावी राहून काम करता येते. संघटनामध्ये नव्या सदस्यांची भरती, प्रसार, निधीसंकलन याशिवाय बॉम्ब कसा बनवायचा याचे प्रशिक्षण देण्यासाठीही सोशल मीडियाचा वापर दहशतवादी करत आहेत, असे वीमॅन यांनी स्पष्ट  केले.
वीमॅन हे दहशतवाद्यांच्या संभाषण आणि दळणवळण कौशल्यावर अभ्यास करत आहेत. ते म्हणाले की, १९९८ साली केवळ १२ दहशतवादी संघटनांच्या वेबसाइट अस्तित्वात होत्या आणि हाच आकडा आता १० हजारांवर पोहोचला आहे. दहशतवादी संघटनेच्या चाटरुम्स आहेत. दहशतवादी संघटनांनी ऑनलाइन माध्यमांमध्ये इतर कोणताही फायदा करून घेतला नसला तरी ‘इन्स्पायर’सारखे इंग्लिशमधील छोटेसे नियतकालिक सुरू केले आहे. या नियतकालिकाचा वापर दहशतवादाच्या अमेरिका आणि इतर ठिकाणच्या पाठिराख्यांना प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांना संघटनेत भरती करून घेण्यासारखी महत्त्वाची कामे करत असल्याचे ते म्हणाले. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियासारखे प्रभावी माध्यम दहशतवाद्यांच्या हाती लागले आहे. सर्वात धोकादायक  म्हणजे ते युवावर्गाला आपले लक्ष्य बनवत आहेत आणि सुरक्षा यंत्रणेसमोरील हा सर्वात मोठा धोका आहे, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.