एका ३४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नी आणि तीन मुलांची राहात्या घरी हत्या केली व हत्येची कबुली देणारा व्हिडिओ कुटुंबाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर पोस्ट केला. गाझियाबादच्या इंदिरापूरममध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. हत्या केल्यानंतर आरोपी सुमित कुमार घटनास्थळावरुन पळून गेला. स्वत:ला संपवण्यासाठी पोटॅशिअर सायनाईड विकत घेतल्याचे त्याने व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इंदिरापूरममध्येच राहणाऱ्या सुमित कुमारच्या बहिणीने पंकज सिंह यांना माहिती दिली. ते लगेच सुमित कुमारच्या घरी पोहोचले. दरवाजा बाहेरुन लॉक होता. पंकज कुमार यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी सुमित कुमारची पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडलेले होते.

सुमित कुमारची पत्नी अंशू बाला एका प्ले स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी करायची. सुमित कुमारने डिसेंबरमध्ये नोकरी सोडली होती. घर खर्च चालवण्यासाठी हातात पैसा नव्हते. त्या हताशेमधून सुमित कुमारने हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. पोलीस सुमितचा शोध घेत असून त्याचा मोबाइल फोन बंद आहे.