News Flash

अध्यक्षपद सोनिया गांधींकडे!

काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्याबाहेर नाहीच..

काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्याबाहेर नाहीच..

लोकसभा निवडणुकीनंतर अत्यंत बिकट अवस्थेत असलेल्या काँग्रेसला वाचवण्यासाठी गांधी घराण्याचाच आसरा पक्षाने घेतला आहे. पक्ष कार्यकारिणीच्या बारा तासांच्या बैठकीनंतर शनिवारी रात्री काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच, कार्यकारिणीने राहुल गांधी यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामाही स्वीकारला.

गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला पक्षाध्यक्ष करण्याची राहुल गांधी यांची विनंती फेटाळून लावत पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबातील सदस्याकडेच ठेवण्यात आले आहे. गांधी घराण्यातील पक्षाध्यक्ष नसेल तर पक्षात फूट पडण्याचा धोका टाळण्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडेच पक्षाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. पक्षाध्यक्ष निवडीसाठी नेमलेल्या कार्यकारिणीच्या  उपसमितीने देशभरातील तीनशेहून अधिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याची मागणी एकमताने करण्यात आली. उपसमितीने अहवाल सादर केल्यानंतर राहुल यांना पुन्हा पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली गेली. पण, त्यांनी ठाम नकार दिल्यानंतर सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर कार्यकारिणी सदस्यांना प्रतिसाद देत सोनिया यांनी हंगामी अध्यक्ष होण्यास मान्यता दिली, अशी माहिती प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना दिली.

निवड लांबली!

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी अकरा वाजता सुरू झाली. एकाच बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचे नाव निश्चित केले जाईल अशी शक्यता पुढील तीन तासांमध्ये संपुष्टात आली. ‘यूपीए’च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी अहमद पटेल, ए. के. अँटनी आणि के. वेणुगोपाल या तीन ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे आणि मुकुल वासनिक यांचे नाव संभाव्य अध्यक्षपदी घेतले जात होते. त्यामुळेच कार्यकारिणीच्या सकाळच्या सत्रामध्येच नव्या पक्षाध्यक्षाचे नाव जाहीर होईल असे मानले जात होते. मात्र, दोन वाजता कार्यकारिणीतील सदस्यांनी रात्री आठच्या सुमारास पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेतला. तांत्रिकदृष्टय़ा अध्यक्ष असणारे राहुल गांधी शुक्रवारी दहा जनपथ येथे सोनियांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपस्थित होते. त्यांनी नवा पक्षाध्यक्ष नियुक्त करताना अधिक व्यापक चर्चा करण्याचा आग्रह धरला. हीच आग्रही भूमिका त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीतही घेतली. शिवाय, कुठल्या एका नेत्यावर एकमत न झाल्यानेही कार्यकारिणी सदस्यांनी पक्ष संघटनेतील नेते, पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा कौल घेण्याचे ठरवले. या मुद्दय़ावर सहमती होऊन सकाळच्या सत्रातील बैठक तात्पुरती थांबवण्यात आली.

बैठकीत राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती पुन्हा एकदा करण्यात आली. त्यांच्या राजीनाम्यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात ओला नाही, असे या बैठकीनंतर पक्षाप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, राहुल गांधी दुपारी एकच्या सुमारास बैठक सोडून निघून गेल्यामुळे सदस्यांची विनंती त्यांनी अव्हेरल्याचे स्पष्ट झाले.

त्याआधी ‘यूपीए’च्या अध्यक्ष सोनिया गांधी यादेखील बैठकीतून बाहेर पडल्या. ‘नवा पक्षाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेमध्ये आपण तसेच, राहुल आम्ही दोघेही सहभागी होणार नाही’, असे त्यांनी काँग्रेस मुख्यालयात उपस्थित पत्रकारांना सांगितले. मात्र, उत्तर-पूर्वच्या महासचिव पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रियंका गांधी बैठकीला अखेरपर्यंत हजर होत्या. त्यामुळे गांधी घराण्यातील सदस्य नव्या पक्षाध्यक्षाच्या निवडीत सहभागी असल्याची बाब समोर आली.

निवडीसाठी विभागीय गट

राहुल गांधी यांच्या सूचनेवरून कार्यकारिणी सदस्यांचे पाच विभागीय उपसमितीत विभाजन केले गेले. प्रत्येक वरिष्ठ महासचिवाच्या अखत्यारितील ईशान्य, पूर्व, उत्तर पश्चिम आणि दक्षिण या उपसमितीत समन्वयकाकडे त्यांच्याकडील राज्यांमधील पक्ष संघटनेशी चर्चा आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात आली. उत्तर प्रदेशसाठी रजनी पाटील आणि दक्षिणेसाठी राजीव सातव हे समन्वयक होते. सोनिया, राहुल आणि प्रियंका यांचे नाव अनुक्रमे पूर्व, उत्तर आणि पश्चिम उपसमितीत समाविष्ट केले होते. मात्र, चुकून आमची नावे समाविष्ट केल्याची प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली. या उपसमित्यांनी त्या त्या राज्यांमधील खासदार, आमदार, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळातील गटनेता, विविध विभागांचे सचिव अशा विविध स्तरातील पदाधिकाऱ्यांशी उपसमितीने चर्चा करून अहवाल कार्यकारिणीला सादर करण्याचा तसेच, चर्चेतून तयार झालेल्या व्यापक सहमतीवर रात्री आठ वाजता पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचा कार्यकारिणीने ठरवले, अशी माहिती सकाळच्या सत्रानंतर प्रवक्ते सुरजेवाला यांनी दिली.

राहुल यांचे दीड वर्ष

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी मे महिन्यात कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. दीड वर्ष पक्षाध्यक्षपदावर राहिलेल्या राहुल यांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला पक्षाध्यक्ष करण्याची विनंती केली होती. वास्तविक, राहुल यांच्यानंतर प्रियंका गांधी यांचे नाव प्राधान्याने घेतले जात होते.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी प्रियंका यांना पक्षाध्यक्ष करण्याची मागणी केली होती. मात्र, गांधी कुटुंबातील कोणीही व्यक्ती पक्षाध्यक्ष होणार नाही या भूमिकेवर राहुल कायम होते.

काश्मीरमधील हिंसाचाराचा निषेध

शनिवारी रात्री आठ वाजता दुसऱ्या सत्रातील बैठकीसाठी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होत्या. मात्र, राहुल गांधी उशिरा बैठकीत सहभागी झाले. तासाभरानंतर राहुल यांनी बैठकीतून बाहेर आले. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार होत असून खोऱ्यात नेमकी काय स्थिती आहे याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी द्यावी अशी मागणी राहुल यांनी केली. या मुद्दय़ावरील चर्चेसाठी आपल्याला बोलावले होते असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. या तासाभराच्या काळात पक्षाध्यक्ष निवडीची बैठक थांबवण्यात आली होती. राहुल मुख्यालयातून निघून गेल्यावर बैठक पुन्हा सुरू झाली. जम्मू-काश्मीरमधील स्थितीसंदर्भात बैठकीत ठरावही संमत करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 2:40 am

Web Title: sonia gandhi rahul gandhi congress party chief mpg 94
Next Stories
1 काश्मीरबाबत भारतावर दबावाचे प्रयत्न फोल
2 उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचण्या
3 जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक आदेश मागे
Just Now!
X