संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. अविश्वास प्रस्तावावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. सोनिया गांधींनी बुधवारी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचे संकेत दिले होते. तर गुरूवारी संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी त्याला प्रत्युत्तर देत सोनिया गांधींचं गणित कच्चं असल्याची टीका केली आहे. सोनिया गांधींना आकडेवारी समजत नाही. १९९६ मध्येही त्यांनी असंच केलं होतं..नंतर काय झालं.. ते जनतेसमोर आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मोदी सरकार बहुमतात आहे. सरकारला संसदेतही समर्थन आहे आणि संसदेच्या बाहेरही मोठा पाठिंबा असल्याचे अनंतकुमार यांनी ठामपणे सांगितले. संसदेबाहेर माध्यमांबरोबर ते बोलत होते. ते म्हणाले, सोनिया गांधी यांचं गणित खूप कच्चं आहे. त्यांना आकडेवारी समजत नाही. १९९६ मध्येही त्यांनी असाच आकड्यांचा खेळ केला होता.. नंतर काय झालं, हे जगासमोर आहे. यावेळीही त्यांचं गणित कच्चं असल्याने त्यांना योग्य आकड्यांचा मेळ बसवता येत नसल्याचे म्हटले.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्यानंतर विरोधकांचे मनोबल वाढले आहे. संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सभागृहातील आकडेवारीबाबत बोलताना पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला होता. कोण म्हणतं, आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. शुक्रवारी संपूर्ण विरोधकांची ताकद दिसून येईल, असा दावा त्यांनी केला होता.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी अशा अविश्वास प्रस्तावाचा काहीच उपयोग नसल्याचे म्हटले होते. शुक्रवारी आम्ही पुन्हा बहुमत सिद्ध करू. अविश्वास प्रस्ताव सहज जिंकू असा विश्वास व्यक्त करत विरोधी पक्षांना आमची तेव्हाच ताकद दिसून येईल असे म्हटले होते.