मान्सून केरळ आणि लक्षद्वीपमध्ये धडकला आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीवरही पावसाला सुरूवात झाली आहे. आता लवकरच पाऊस महाराष्ट्रातही बरसेल अशीही माहिती स्कायमेटने दिली आहे. येत्या आठ ते दहा तासात सोसाट्याच्या वाऱ्यासह अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, परभणी, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा या शहरांमध्ये पाऊस होईल अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर केरळमध्ये मान्सून धडकला असल्याची माहितीही स्कायमेटने दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने आणि उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसेच बळीराजासाठीही ही आनंदाची बातमी आहे यात काहीही शंका नाही.

दरम्यान आज मुंबई शहर आणि उपनगरांतही पावसाच्या काही सरी झाल्या. दादर, वरळी, लोअर परळ, कांदिवली, बोरीवली, मालाड या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. देशात यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यात कमी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आता मान्सून केरळात दाखल झाला आहे त्यामुळे तो महाराष्ट्रातही दाखल होईल यात शंकाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर मिळेलच शिवाय पाऊस आपला बॅकलॉग भरून काढत बरसेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.