समाजवादी पक्षाचे सहा उमेदवार जाहीर

लखनौ : समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांना मैनपुरीची सुरक्षित जागा देण्यात आली आहे.

बदाऊ येथून धर्मेद्र यादव, फिरोझाबादमधून अक्षय यादव तर इटवाहमधून कमलेश कठेरिया यांना उमेदवारी दिली आहे. रॉबर्टगंज येथून भाईलाल कोल, बहराइच येथून शब्बीर वाल्मिकी निवडणूक लढवतील, असे पक्षाने जाहीर केले आहे.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी ही यादी जाहीर केली असून मुलायमसिंग यादव हे सध्या आझमगडचे खासदार असले, तरी त्यांना आता मैनपुरी हा सुरिक्षत मतदारसंघ दिला आहे, तो समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो.

मुलायमसिंह यादव यांनी १९९६, २००४, २००९ या निवडणुकांत मैनपुरीतून प्रतिनिधित्व केले होते. २०१४ मध्ये त्यांनी आझमगड व मैनपुरी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली. दोन्ही ठिकाणांहून विजय मिळवला होता. मैनपुरीत त्यांनी ३.६४ लाख मतांनी विजय मिळवला होता.

राज्यपाल राजशेखरन यांचा राजीनामा

तिरुवअनंतपूरम : भाजपचे ज्येष्ठ नेते के. राजशेखरन यांनी मिझोरामच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजशेखरन यांना तिरुवअनंतपूरम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान खासदार शशी थरूर यांच्याविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.