स्पेनमध्ये करोना विषाणूचा प्रसार वेगाने झाल्यामुळे आता इटलीपाठोपाठ तेथेही प्रवासबंदीसह अन्य कठोर निर्बंध जारी करण्यात आले. तेथे दोन आठवडय़ांची आणीबाणी जाहीर करण्यात आली.  स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांच्या पत्नीची करोना चाचणी सकारात्मक आली आहे.

स्पेनमध्ये शनिवारी सगळा देश बंद ठेवण्याची वेळ आली. प्रादेशिक ठिकाणी या दोन्ही देशांना करोनाचा प्रसार रोखण्यात अपयश येत असताना हा निर्णय घेण्यात आला.

स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांनी अनेक आपत्कालीन उपाय देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जाहीर केले. त्यांनी सात तास मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सँचेझ यांचे सोशालिस्ट व विरोधी युनायटेड वुई कॅन यांच्यातील संघर्ष करोनाग्रस्त परिस्थितीतही चालूच आहे त्यामुळे बैठक लांबल्याचे समजते. आता फक्त आरोग्य हा अग्रक्रम राहील तसेच अन्न व औषधे खरेदी, लहान मुले  व तरुणांची शुश्रुषा, बँक व्यवहार  यासाठी घरातून बाहेर पडता येईल. सर्व  रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, शाळा, विद्यापीठे, अनावश्यक किरकोळ विक्री केंद्रे बंद  करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ५७५३ जणांना विषाणूचा संसर्ग झाला असून जानेवारीत स्पेनमध्ये पहिला रुग्ण सापडला होता. आता गेल्या २४ तासात १५०० रुग्ण वाढल्याचे निदर्शनास आले असून येत्या काही दिवसात बाधित  रुग्णांची संख्या १० हजार होऊ शकते, अशी भीती पंतप्रधान सँचेझ यांनी व्यक्त केली आहे. इटलीने त्यांचे निर्बंध उत्तरेकडील भागात ९ मार्च रोजी वाढवले होते. तेथे त्यावेळी ९ हजार रुग्ण होते. ११ मार्च रोजी आणखी रुग्ण वाढल्याने तेथे किरकोळ विक्री केंद्रे बंद करण्यात आली.

माद्रिद व बार्सिलोनात बार, रेस्टॉरंट, अनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली आहेत. या दोन्ही वर्दळीच्या शहरात आता शांतता असून सामाजिक अंतर राखणे हाच एकमेव उपाय असल्याचे चीनच्या अनुभवातून स्पष्ट झाले होते. काही हॉटेल्समध्ये तात्पुरते दवाखाने सुरू करण्यात आले असून सुपरमार्केट सुरू असल्याने तेथे गर्दी होती. विमानतळे खुली असली तरी स्पेनकडे येणाऱ्या विमानांची संख्या आता घटली आहे. यापूर्वी स्पेनमध्ये १९७० च्या दशकात व नंतर २०१० च्या हवाई नियंत्रक अधिकाऱ्यांच्या संपात आणीबाणी पुकारण्यात आली होती.

उपाययोजनांत विलंब झाल्याची टीका

स्पेन सरकारने देश बंद ठेवण्यास फार विलंब केल्याची टीका सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी केली आहे. सँचेझ यांनी देश बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याआधीच काही  प्रांतिक सरकारांनी रेस्टॉरंट व अनावश्यक  दुकाने बंद केली होती. माद्रिद, ईशान्य कॅटोलिना या प्रांताच्या नेत्यांनी सँचेझ यांच्यावर निर्बंध उशिरा लागू केल्याबाबत टीका केली आहे.