जगभरात थैमान घालत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत देशात ८८ हजार ६०० नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार १२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख ९२ हजार ५३३ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ५९ लाख ९२ हजार ५३३ करनाबाधितांमध्ये ९ लाख ५६ हजार ४०२ अॅक्टिव्ह रुग्ण, डिसचार्ज मिळालेले ४९ लाख ४१ हजार ६२८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९४ हजार ५०३ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

याबरोबर देशात २६ सप्टेंबरपर्यंत ६,१२,५७,८३६ नमूने तपासण्यात आले असून, यातील ९ लाख ८७ हजार ८६१ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरकडून ही माहिती समोर आली आहे.

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष करोना व्हायरसचा फैलाव रोखणाऱ्या लशीकडे लागले आहे. अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये लशी मानवी चाचणीच्या निर्णायक टप्प्यांवर आहेत. अमेरिकेत तर नोव्हेंबरपासन लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. ट्रम्प प्रशासनाने तशी तयारीच केलेली आहे.