लहान मुलांना लावण्यात येणाऱ्या पावडर आणि तेलामध्ये घातक घटक असल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. भारतामध्ये आजही वापरल्या जाणाऱ्या अनेक बेबी प्रोडक्टसवर परदेशामध्ये बंदी आहे. अनेकदा या प्रोडक्टमधील घातक घटकांसंदर्भातील बातम्या समोर आल्यानंतर पालकांची काळजी वाटते. मात्र बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रोडक्टपैकी चांगले प्रोडक्ट कोणते आणि वाईट कोणते हे अनेकदा पालकांना समजत नाही. मात्र याच समस्येवर उपाय काढण्यासाठी दिल्लीतील एका जोडप्याने २५ लाख रुपये गुंतवणूक करत सुरु केलेला उद्योग आज १०० कोटींपर्यंत पोहचला आहे.

कोण आहे हे जोडपे?

बाळांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रोडक्टबद्दलच्या बातम्यांमुळे इतर पालकांप्रमाणे दिल्लीत राहणाऱ्या वरुण अलघ आणि गझल अलघ यांनाही चिंता वाटू लागली. आपल्या लहान मुलासाठी कोणतेही घातक आणि हानीकारक घटक नसणारे प्रोडक्ट वापरता यावेत म्हणून या दोघांनीच अशी प्रोडक्ट निर्माण करण्याच्या उद्योगात उडी घेतली. या दोघांनी आशियात पहिल्यांदाच बालकांसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र मिळवणारा ‘ममाअर्थ’ हा ब्रॅण्ड २०१६ साली बाजारात लॉन्च केला. ‘ममाअर्थ’चे सर्व प्रोडक्ट हे रसायनमुक्त आणि नैसर्गिक आहेत.

कशी केली सुरुवात?

वरुण आणि गझलने आधी भारतीय बाजारापेठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेबी प्रोडक्टचा अभ्यास केला. आपण बाजारामध्ये एखादा ब्रॅण्ड आणणार असू तर तो पूर्णपणे भारतीय बनावटीचा असायला हवा असा या दोघांचाही आग्रह होता. सामान्यांना या वस्तू परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी भारतात निर्मिती करणे फायद्याचे आहे हे या दोघांना ठाऊक असल्याने स्वदेशी ब्रॅण्ड निर्माण करण्यावरच त्यांचा भर होता. या दोघांनी अनेक महिने अभ्यास केल्यानंतर त्यांनी रसायनमुक्त आणि नैसर्गिक पद्धतीने प्रोडक्ट कसे निर्माण करु शकतो याबद्दल सर्वा माहिती शोधून काढली आणि अशा लोकांना गोळा केलं. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या कंपनीची संशोधन प्रयोगशाळा सुरु केली. या प्रयोगशाळेमध्ये प्राथमिक स्तरावर तयार करण्यात आलेल्या प्रोडक्टची चाचणी घेण्यात आली. अमेरिकेत ज्या पद्धतीने या बालकांशी संबंधित प्रोडक्टचा दर्जा ठरवला जातो त्या सर्व चाचण्या करुन या प्रोडक्टची चाचण्या करण्यात आल्या. मेडसेफ या जागतिक दर्जाच्या मानांकन संस्थेच्या दर्जानुसार त्यांनी प्रोडक्ट बनवले. ‘ममाअर्थ’ मार्फत बनवण्यात येणाऱ्या प्रोडक्टपैकी आठ हजार प्रोडक्ट हे रसायनमुक्त असतात.

शिल्पा शेट्टीचा पाठिंबा

बाजारामध्ये नुकताच दाखल झालेला ब्रॅण्ड आणि भारतीय बाजारपेठीतील स्पर्धा यामुळे व्यवसाय कसा वाढवायचा आणि टीकवायचा याबद्दलच्या शंका वरुण आणि गझलच्या मनात होत्या. त्यांना या ब्रॅण्डचे प्रमोशन करण्यासाठी एखादा सेलिब्रिटी चेहरा हवा होता. त्यांनी यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे विचारणा केली. त्यावेळी शिल्पाने त्यांची कल्पना ऐकून गुंतवणूकदार होण्याची तयारी दर्शवली. शिल्पाच्या रुपाने या दोघांच्या कंपनीला एक मोठा आणि विश्वासार्हता असणारा चेहरा ब्रँड अ‍ॅम्बॅसडर म्हणून मिळाला. शिल्पाने दर्शवलेल्या या पाठिंब्यामुळे या दोघांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

वाढता वाढता वाढे…

सुरुवातील केवळ ऑनलाइन माध्यमातून ‘ममाअर्थ’ने प्रोडक्ट विकण्यास सुरुवात केली. मात्र आता थेट दुकानांमधूनही विक्री सुरु केली आहे. सध्या भारतातील ३०० शहरांमध्ये ‘ममाअर्थ’चे १० लाखांहून अधिक गिऱ्हाईक आहेत. वरुण आणि गझलने सुरुवातील २५ लाखांची गुंतवणूक केली होती. त्यांची कल्पना आवडलेल्या त्यांच्या जवळच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी त्यांना ७५ लाखांची मदत केली. त्यानंतर त्यांनी प्रोफेश्नली वेगवेगळ्या गुंतवणूकदारांसमोर आपला प्रस्ताव मांडला. वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून त्यांनी ३० कोटींचा निधी उभारला.

१०० कोटींहून अधिकची उलाढाल

कंपनीने नुकताच आर्थिक उलाढालीमध्ये १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता या कंपनीच्या माध्यमातून बेबी प्रोडक्टबरोबरच प्रौढांसाठींचे रसायनमुक्त आणि नैसर्गिक प्रोडक्ट बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.