विरोधकांना भ्रष्टाचार आणि विकास यांसारख्या मुलभूत मुद्यांवर काहीच बोलता येत नसल्याने त्यांच्याकडून गोरक्षकांचा विषय उपस्थित केला जातो आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली. ‘विरोधकांकडे मुद्देच नसल्याने गोरक्षणाच्या आधारे एका समुदायाला लक्ष्य करण्यात येत आहे,’ असे पासवान यांनी म्हटले. गोरक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राज्य सरकारे ऐकत नाहीत. मग पंतप्रधानांनी राज्यांमध्ये सैन्य पाठवायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत बोलताना कथित गोरक्षकांकडून सुरू असलेल्या हिंसेचा निषेध केला. या घटनांविरोधात सर्वसंमतीने निषेधाचा प्रस्ताव मंजूर व्हावा, असेही त्यांनी सुचवले. जमावाकडून गोरक्षेसाठी केल्या जाणाऱ्या हिंसेला राज्य सरकारे जबाबदार असल्याचे म्हणत रामविलास पासवान यांनी म्हटले. ‘एकीकडे विरोधक देश एकसंध ठेवण्याची भाषा करतात. तर दुसरीकडे विरोधक या सर्व घटनांची जबाबदारी केंद्र सरकारवरदेखील ढकलतात. या दोन्ही गोष्टी एकाचवेळी होऊ शकत नाहीत,’ असे पासवान यांनी म्हटले. ‘राज्य सरकारे ऐकत नसतील, तर पंतप्रधानांनी सैन्य पाठवायचे का?’, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील तीन वर्षांमध्ये बाबरी मशीद, राम मंदिर, कलम ३७७, आणि समान नागरी कायदा यावर एकदाही भाष्य केलेले नाही. पंतप्रधान वारंवार केवळ विकासावरच बोलतात,’ असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले. ‘जमावाकडून होत असलेल्या हत्या हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. आम्ही या हत्यांचा निषेध करतो. मात्र देशात राजकीय हत्यादेखील होत आहेत. मात्र लोक यावर काहीच बोलत नाहीत. या प्रकरणी फक्त आरोप-प्रत्यारोपांमुळे काहीच होणार नाही. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काय करायला हवे, याबद्दलच्या सूचना करायला हव्यात,’ असेही पासवान पुढे बोलताना म्हणाले.