अट्टल चोर नटवरलाल मिथिलेश कुमार श्रीवास्तव ऊर्फ नटवरलाल सर्वांनाच माहित असेल. नटवरलाने विदेशी पर्यटकांना भारताचे राष्ट्रीय वैभव ताजमहाल तीनदा, लाल किल्ला दोनदा, राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि ५४५ खासदारांना विकले होते. याच घटनेशी मिळतीजुलथी घटना समोर आली आहे. यावेळी एका अट्टल चोरानं चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला विक्रीसाठी काढलेय. गुजरातमधील एका महाभागाने ओएलएक्सवर चक्क स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या विक्रीची जाहिरात दिली आहे. विशेष म्हणजे याला तब्बल ३०,००० कोटींची बोलीही लागली आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, करोना व्हायरस या महामारीच्या लढ्यात मोदी यांनी जनतेला आर्थिक मदतीचं आवाहन केलं होते. त्याला प्रतिसाद देत गुजरातमधील एका महाभागाने चक्क ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं विक्रीला काढले आहे. गुजरातमधील या बातमीमुळे लोकांचे डोळे मोठे झाले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल, आयर्न मॅन ऑफ इंडिया यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाने ओळखला जातो. २०१८ मध्ये हा पुतळा उभारण्यात आला यासाठी तब्बल २९८९ कोटींचा खर्च झाला होता. स्टॅच्यू ऑफ युनिटीवर झालेल्या खर्चामुळे मोदी सरकारला टीकेला सामोरं जावं लागले होते. आता हीच संधी साधून एका व्यक्तीनं ओएलक्सवर स्टॅच्यू ऑफ युनिटी विक्रीसाठी काढला आहे.

काय आहे जाहिरात –
‘सध्या देशात रूग्णालय आणि हेल्थकेअर इक्विपमेंट्ससाठी पैशांची गरज असल्याने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विकण्याची वेळ आली आहे.’

ओएलएक्सचा स्टँड –
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विक्रीसाठी काढून मस्करी केल्याचं समजताच कंपनीनं ओएलएक्सवरून जाहीरात तात्काळ हटवली आहे. मात्र सोशल मिडीयावर या गोष्टीची तुफान चर्चा चालू आहे.

गुन्हा दाखल –
ओएलएक्सवर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विक्रीसाठी काढल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधान आले आहे. ही बाब पोलिसांना समजताच त्यांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी अज्ञांत व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.