भारत व अमेरिका यांनी जागतिक संरक्षण व सुरक्षा व लष्करी पातळीवरील सहकार्य वाढवण्याच तसेच माहितीचे आदान प्रदान, रसद पुरवठा या क्षेत्रातही एकमेकांना मदत करण्याचे ठरवलेआहे.

हिंद प्रशांत विभाग मुक्त, खुला व सर्वसमावेशक करण्याचा निर्धारही उभय देशांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन  हे सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी त्यांचे समपदस्थ राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. दोघा मंत्र्यांनी सांगितले, की  अमेरिका हिंद-प्रशांत क्षेत्रात भारतीय लष्कराशी सहकार्य करेल. अमेरिकी लष्कराचा आफ्रिकी कमांड विभाग व सेंट्रल कमांड विभागही यात मदत करणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले, की अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांच्याशी आपली सर्वसमावेशक व फलश्रुतीपूर्ण चर्चा झाली. भारत व अमेरिका यांच्यातील सर्वंकष जागतिक भागीदारी महत्त्वाची असून त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर केला जाईल. भारत व अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रातील पायाभूत कराराबाबत त्यांनी सांगितले, की दोन्ही देशात रसद आदानप्रदान सुसंगतता व सुरक्षितता करार (लिमोआ) व संदेशवहन सुसंगतता व सुरक्षा करार ( कॉमकॅसा) तसेच मूलभूत आदानप्रदान व सहकार्य करार ( बीइसीए) यांचा पूर्ण वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.

‘ठोस संदेश!’

अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन यांनी सांगितले, की हिंद प्रशांत भागात भारताशी सर्वंकष व दूरदर्शी संरक्षण भागीदारी करण्याची आमची इच्छा आहे. भारत व अमेरिका यांच्यातील संबंध हाच हिंद प्रशांत क्षेत्रातील मुक्त व खुल्या व्यवस्थेचा पाया आहे. राजनाथ सिंह यांच्याशी आपली फलश्रुतीपूर्ण चर्चा झाली असून अमेरिकी मित्र देश व भागीदार देश यांच्या वतीने बायडेन व हॅरिस प्रशासनाचा ठोस संदेश घेऊन आपण भारतात आलो आहोत.