दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाच्या आवारात जमावाकडून हिंसाचार सुरु असताना पोलिसांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मारहाण केली असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी म्हटले आहे. प्रियंका गांधी वड्रा यांनी रविवारी रात्री एम्स रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

त्यावेळी एका विद्यार्थ्याने पोलिसांनीच आपल्याला मारहाण केली असे प्रियंका गांधी यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांना आलेला भयानक अनुभव प्रियंका गांधी यांच्यासमोर कथन केला. विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी टि्वटस करुन सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हटलं आहे टि्वटसमध्ये ?
गुंडांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून लाठया, काठया आणि अन्य शस्त्रास्त्रांनी हल्ला चढवला असे विद्यार्थ्यांनी मला सांगितले. अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला मार लागला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. एका विद्यार्थ्याने पोलिसांनीच त्याला लाथा मारल्याचे सांगितले.

स्वत:च्याच मुलांवर हिंसाचार करण्यासाठी सरकारकडून परवानगी, प्रोत्साहन दिले जातेय. हे खूप दु:खद आहे असे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

उदार लोकशाही म्हणून भारताने जगात प्रतिष्ठा मिळवली आहे. पण आता मोदी-शाहंचे गुंड आमच्या विद्यापीठांमध्ये हिंसाचार करत आहेत. चांगले भवितव्य घडवण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण करत आहेत अशी टीका प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटमधून केली आहे.

आणखी वाचा – JNU violence : अनेक तक्रारी दाखल, लवकरच गुन्हा दाखल करु – दिल्ली पोलीस

जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं ?
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष गंभीर जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

आणखी वाचा – JNU violence: गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून दिल्ली पोलिसांना चौकशीचे आदेश

या हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.

मुंबई-पुण्यात मध्यरात्री विद्यार्थ्यांची निदर्शने
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात उमटू लागले आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ मध्यरात्री मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. यामध्ये विद्यार्थी नेता उमर खलिदही सहभागी झाला होता. तसेच मुंबई आयआयटीमध्येही विद्यार्थ्यांनी निशेध नोंदवला आहे. तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला.