विद्यापीठाच्या व्यवस्थापनाचे मौन, विद्यार्थी अडचणीत येण्याची शक्यता
देशभरात मंगळवारी मोठ्या उत्साहात दसरा साजरा झाला. यावेळी रावणाचे दहन करताना देशभरात अनेक ठिकाणी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ, २६/११ चा मास्टरमाईंड हफिज सईद यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मात्र दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी दसऱ्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिमा जाळल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वीच कथित देशविरोधी घोषणांवरुन जेएनयूतील विद्यार्थी अडचणीत आले होते. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या प्रतिमा जाळल्यामुळे जेएनयूतील विद्यार्थी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात जेएनयूतील विद्यार्थ्यांनी गुजरात सरकार आणि गोरक्षकांच्या प्रतिकात्मक पुतळे जाळले होते. यामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडण्ट्स युनियन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी दसऱ्याच्या रात्री रावणाचा पुतळा म्हणून मोदींची प्रतिकृती जाळली. सरकार दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात कमी पडल्याने आपण त्यांचा विरोध करत असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली. शैक्षणिक संस्थांवर वारंवार आक्रमण करुन त्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोपदेखील या विद्यार्थ्यांनी केला.
मोदी, शाह यांच्यासोबतच योगगुरु रामदेव, साध्वी प्रज्ञा, नथुराम गोडसे, आसाराम बापू यांच्या प्रतिमादेखील विद्यार्थ्यांकडून जाळण्यात आल्या. ‘सत्य वाईट गोष्टींवर विजय मिळवेल’, अशा आशयाचे फलक यावेळी विद्यार्थ्यांनी हातात धरले होते.
‘आम्ही प्रतिमा जाळून या सरकारबद्दलचा निषेध व्यक्त करत आहोत. या दुष्ट सरकारला मुळासकट उखडून त्याऐवजी लोकांसाठी काम करणारे सरकार आणायचे आहे,’ अशी प्रतिक्रिया एनएसयूआयच्या सदस्या सनी दिमान यांनी दिली आहे.
जेएनयू कॅम्पसमधील सरस्वती ढाबा या ठिकाणी एनएसयूआयच्या सदस्यांकडून प्रतिमा जाळण्यात आल्या. मात्र याप्रकरणी जेएनयूच्या व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.