News Flash

‘जेएनयू’मध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या हल्ल्याबाबत विद्यापीठाचे निबंधक प्रमोद कुमार यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

१८ जखमी, ‘अभाविप’वर आरोप; गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष गंभीर जखमी झाली.  या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले.

या हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला  आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या हल्ल्याबाबत विद्यापीठाचे निबंधक प्रमोद कुमार यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे. देशभरातील बुद्धिवंत, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विरोधी पक्षांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हल्ल्यामागे केंद्रातील सत्ताधारी भाजपचा हात असल्याचा आरोप आप’सह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

जेएनयू शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या जाहीर शांतता सभेत काहीजण लाठय़ा-काढय़ा घेऊन घुसले. त्यांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयुषी हिच्यासह अनेक विद्यार्थ्यांवर हल्ला केला. दगडफेकही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्यात आयेषीसह अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. बहुतेकांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जेएनयू प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार चेहरे झाकलेले हल्लेखोर लाठय़ा-काठय़ा घेऊन विद्यापीठात घुसले आणि त्यांनी विद्यार्थी-प्राध्यापकांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी विद्यापीठाच्या मालमत्तेचीही मोठय़ा प्रमाणावर तोडफोड केली.

‘अभाविप’च्या सदस्यांनी केलेल्या दगडफेकीत आयेषी घोष हिच्यासह अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा सांगणाऱ्या ‘अभाविप’ने मात्र या आरोपाचा इन्कार केला. हल्ल्यामागे एसएफआय, एआयएसएफ आणि डीएसएफ या संघटनांचा हात असून आमचे २५ सदस्य जखमी झाल्याचे ‘अभाविप’नेम्हटले आहे.

चेहरा झाकून घेतलेल्या ‘अभाविप’चे सदस्य पोलिसांच्या उपस्थितीतच लाठय़ा-काठय़ा, लोखंडी शिगा आणि हातोडे घेऊन जेएनयूत घुसले. त्यांनी भिंतींवर चढून वसतिगृहांमध्ये प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ‘अभाविप’च्या सदस्यांनी विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयुषी घोष हिच्यावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले असून तिच्या डोक्यातून मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव सुरू असल्याची माहिती जेएनयू विद्यार्थी संघटनेने दिली. ‘अभाविप’ने हा आरोप फेटाळला आहे.

पोलिसांना कारवाईच्या सूचना

हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दिल्ली पोलिसांकडे तातडीने अहवाल मागवला असून वरिष्ठ पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री शहा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून त्यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ट्विट गृहमंत्रालयाने केले आहे.

तातडीने अहवाल मागवला

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जेएनयूच्या निबंधकांकडे हल्ल्याबाबतचा अहवाल तातडीने मागितला आहे. या हल्ल्याचा अहवाल युद्धपातळीवर मागवला असून विद्यापीठ परिसरात शांतता राखण्यासंदर्भात कुलगुरू आणि दिल्ली पोलिसांशी चर्चा केल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या हिंसाचाराच्या निषेधार्थ देशातील विविध विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरु झाले आहे.

मुंबईत आज निदर्शने

मुंबई : जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी मुंबईतील विविध संघटना निदर्शने करणार आहेत. हुतात्मा चौक येथे सायंकाळी ४ वाजता छात्र भारती, जॅक मुंबई आणि सर्व पुरोगामी संघटना आंदोलन करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 12:47 am

Web Title: students professors injured in violence at jnu abn 97
Next Stories
1 नागरिकत्व कायद्याबाबत गैरसमज नकोत -राजनाथ सिंह
2 ‘नानकाना साहिब’वरील हल्ल्याचा इम्रान खान यांच्याकडून निषेध
3 इराकच्या संसदेचा परकीय फौजांना देशात प्रतिबंध करण्याचा ठराव
Just Now!
X