नासाच्या वैज्ञानिकांचे यश
मंगळावर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या व फुगवता येणाऱ्या डोनटच्या आकाराच्या उष्णतारोधक आवरणाची चाचणी नासाने यशस्वीरीत्या घेतली आहे. उष्णतारोधक आवरणाचे नवे तंत्रज्ञान अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. या आवरणामुळे अवकाशयान मंगळावर गेल्यानंतरही तेथील उष्ण वातावरणात हळूहळू खाली येत यशस्वीरीत्या उतरू शकणार आहे.
नासा अशा आवरणाचा उपयोग दुसऱ्या ग्रहावर उतरण्यासाठी करणार असून ते आवरण अग्निबाणात बसू शकेल असे आटोपशीर करावे लागणार आहे. नासाच्या लँगले रीसर्च सेंटरच्या अभियंत्यांनी ९ फूट व्यासाचे हे डोनटच्या आकाराचे उष्णतारोधी आवरण चाचणीसाठी सिद्ध केले व अवकाश मोहिमेत नेमकी परिस्थिती काय असेल याचा अदमास घेऊन चाचणी यशस्वी केली. या आवरणाला ‘टोरस’ असे म्हटले जाते. हायपरसॉनिक इनफ्लेटेबल एरोडायनॅमिक डिअ‍ॅक्सिलरेटर म्हणजे एचआयएडी हे आवरण पॅराशूटसारखे काम करते. मंगळाच्या वातावरणातील बलांचा वापर त्यात अवकाशयानाची गती कमी करण्यासाठी केला जातो. अवकाशयानाची गती कमी झाल्याने त्याचे तेथील वातावरणात खाली येताना रक्षण होते. चाचणीच्यावेळी निर्वात पंपाचा वापर करण्यात आला. त्याच्या मदतीने ते कमी जागेत बसवण्यात आले असे प्रमुख वैज्ञानिक कीथ जॉनसन यांनी सांगितले. आम्ही ते बसवले व काढूनही दाखवले, त्याच्या गळतीबाबत चाचण्याही केल्या. झायलॉन व टेफलॉनची काही हानी होते का हे तपासले. असे तीनदा करण्यात आले. या तंत्रज्ञानाने जड सामुग्री व वैज्ञानिक उपकरणे अवकाशात पाठवता येतील. त्यानंतर हे सामान अवकाश स्थानकात पोहोचवल्यानंतर ते या आवरणातून काढून उतरवून घेता येईल. चाचणी अभियंता सीन हॅनकॉक यांनी सांगितले की, डोनटच्या आकाराचे उपकरण प्रत्येकवेळी म्हणजे तीनदा सारख्याच पद्धतीने घडी करून दाब देऊन बसवण्यात आले. त्यामुळे अभियंत्यांना अवकाश मोहिमेच्या दृष्टिकोनातून त्याचा कितपत उपयोग होऊ शकतो हे समजले. या चाचणीत इनफ्लेटेबल टोरससाठी वापरलेल्या साहित्याची पॅकिंगच्या दृष्टीने चाचणी झाली. या उष्णतारोधक आवरणाची चाचणी यशस्वी झाल्याने आता ते अधिक विस्तारित उद्दिष्टांसाठी वापरता येईल. आता यातून आणखी मोठे आवरण तयार केले जाणार असून ते अग्निबाणात कमी जागेत बसवता येईल, शिवाय ते मोठा दाब सहन करू शकेल. मंगळावरील उच्च तापमानात ते टिकाव धरेल. या चाचण्यातून अंतिमत: प्रत्यक्ष मंगळ मोहिमेत वापरण्याचे उष्णतारोधक आवरण तयार केले जाईल. पृथ्वीबाहेर जाऊन परत येणे व मंगळावर जाणे या प्रकारच्या मोहिमांसाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.