प्राणी हक्क संघटनेची हस्तक्षेपाची मागणी

येथील ऐतिहासिक अंबेर किल्ल्यात असलेले हत्ती  पर्यटकांची मने रिझवत असले तरी या मुक्या प्राण्याच्या व्यथा जाणून घेण्यास कुणाला वेळ नाही. यातील काही हत्ती अंध असून काहींना क्षय झालेला आहे. त्यांना त्याही अवस्थेत किमान दोनशे किलो वजन पाठीवर वाहून न्यावे लागते. एकूण शंभर हत्तींची ही अवस्था मन विषण्ण करणारी आहे.

भारतीय कल्याण मंडळाने केलेल्या तपासणीनुसार डिसेंबर २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान हाथीगाव येथे १९ हत्तींना बंदी करण्यात आले होते ते अंध आहेत. कुठलेही काम करण्यास ते असमर्थ आहेत. दहा हत्तींना क्षय झाला असून इतर २८ हत्ती हे पन्नासपेक्षा जास्त वयाचे आहेत. या हत्तींवर मानसिक ताण तर आहेच शिवाय ४७ हत्तींच्या सोंडेचा काही भाग कापण्यात आलेला आहे. दोनशे किलोपेक्षा जास्त वजन हे हत्ती वाहून नेतात. अंबेर किल्ल्याच्या परिसरात हत्तींची सवारी लोकप्रिय असली तरी या  हत्तींची अवस्था मात्र वाईट आहे. राजस्थानात जानेवारी २०१५ मध्ये १३२ खासगी हत्ती बंदीवान करून ठेवेले होते. २०१६ मध्ये त्यांची संख्या ११० तर २०१७ मध्ये १०२ होती. १०२ हत्तींपैकी ५३ हत्तींच्या कायदेशीर अनुपालनाबाबत प्रकरणे जयपूर न्यायालयात प्रलंबित आहेत. ४८ हत्तींची मालकी बेकायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. राजस्थान वन विभागाने म्हटल्यानुसार या हत्तींचा खरेदी स्रोत, सध्याची किंमत याचे उल्लेख  चुकीचे देण्यात आले होते.  पर्यावरण व वनविभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला तर कुणालाही अंबेर किल्ल्याजवळ हत्ती फिरवण्याची परवानगी मिळायला नको पण ती देण्यात आली आहे.

वनखात्याची परवानगी न घेता हत्तींच्या मदतीने पर्यटकांना सफर घडवणे तर बेकायदा आहेच पण जयपूरमध्ये हत्तीची दोन पिले ही खासगी व्यक्तीच्या ताब्यात आहेत.

राजस्थानातील एकूण हत्तींच्या संख्येची गणना करण्याची गरज असून प्राण्यांवरील अत्याचारांवर बंदी घालण्याची मागणी पेटा इंडिया या संघटनेने केली आहे. या संघटनेचे अधिकारी निकुंज शर्मा यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा.