प्रशिक्षणार्थी पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसगाडय़ा दहशतवाद्यांकडून लक्ष्य

अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसगाडय़ांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दोन आत्मघातकी हल्ल्यांमध्ये ३७ लोक ठार, तर ४० जण जखमी झाले.

राजधानी काबूलच्या सुमारे २० किलोमीटर पश्चिमेला असलेल्या पाघमान जिल्ह्य़ात हे हल्ले झाल्याचे जिल्हा प्रांतपाल मौसा रहमती यांनी सांगितले. वारदाक प्रांतातील एका प्रशिक्षण केंद्रातून परतत असलेले हे पोलीस सुटीमध्ये काबूलला जात होते.

पहिला हल्ला प्रशिक्षणार्थी पोलिसांना घेऊन जाणाऱ्या दोन बसगाडय़ांवर झाला, तर या ठिकाणी मदतीसाठी गेलेल्यांना लक्ष्य करून झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात तिसरी बस सापडली. ठार झालेल्यांमध्ये चार नागरिकही असल्याचे रहमती म्हणाले.

अंतर्गत मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने हल्ल्याच्या ठिकाणास दुजोरा देताना या ठिकाणी स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आल्याचे सांगितले, तथापि घटनेबाबत आणखी माहिती तो देऊ शकला नाही.

असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला पाठवलेल्या ई-मेलमध्ये तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला घडवून आणला. पहिल्या हल्ल्याचे लक्ष्य प्रशिक्षणार्थी पोलीस व त्यांचे प्रशिक्षक यांना घेऊन जाणारी बस होती, तर पोलीस मदतीसाठी तेथे पोहचल्यानंतर २० मिनिटांनी दुसरा हल्ला करण्यात आला, असे तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने म्हटले आहे.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष मोहम्मद अश्रफ गनी यांनी या हल्ल्याचे वर्णन ‘माणुसकीवरील हल्ला’ असे केले असून, या घटनेची चौकशी करण्याचा आदेश अंतर्गत मंत्रालयाला दिला आहे.

काबूलमधील अमेरिकी दूतावासाने एका निवेदनात या हल्ल्याचा निषेध केला असून, रमझानच्या पवित्र महिन्यात झालेला हा हल्ला क्रूर व तिरस्करणीय असल्याचे म्हटले आहे.