सौदी अरेबियातील पश्चिमेकडच्या जेद्दाह शहरात एका आत्मघाती हल्लेखोराने अमेरिकी वाणिज्य दूतावासकार्यालयावर हल्ला केला, असे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने सांगितले आहे. आत्मघाती हल्लेखोराने स्फोटके असलेला पट्टा सुरक्षारक्षक त्याला पकडण्यासाठी आले असता उडवून दिला. जवळच्या रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सुरक्षाकडे केले असून, जेद्दाह येथे एक मोटार कारमध्ये हल्लेखोर बसलेला होता व त्याने हा स्फोट केला. मोटार अमेरिकी राजनैतिक कार्यालयाच्या जवळ होती. आत्मघाती हल्लेखोर यात ठार झाला असून, दोन सुरक्षा जवान किरकोळ जखमी झाले आहेत असे सौदी प्रेस एजन्सीने सांगितले. पार्किंगमधील काही मोटारींचे नुकसान झाले आहे. अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते  मेजर जनरल अल तुर्की यांनी सांगितले, की एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्याचे सुरक्षारक्षकांना दिसले. अमेरिकी दूतावासाच्या नजीकच्या चौकात डॉ. सोलिमन फकीह रुग्णालयाजवळ त्याची मोटार होती. दूतावासाचे कर्मचारी नवीन कार्यालयाच्या ठिकाणी निघून गेले होते. त्याला दूतावासावर हल्ला करायचा होता किंवा दुसरा काही हेतू होता हे समजू शकले नाही. त्याची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. सौदी अरेबियातील अमेरिकी दूतावासाचे अधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले, की अमेरिकी अधिकाऱ्यांना जेद्दाह येथील स्फोटाची माहिती आहे. सौदी अधिकाऱ्यांकडून ते अधिक माहिती घेत आहेत. २००४ मध्ये अल कायदाने जेद्दाह येथे अमेरिकी दूतावासावर हल्ला केला होता. त्यात स्थानिक पाच कर्मचारी व चार बंदूकधारी ठार झाले होते, त्या वेळी अल कायदाने सौदी अरेबियाच्या पाश्चिमात्य देशांच्या सुरक्षित ठिकाणांवर हल्ले करण्याचे सत्रच आरंभले होते.